देशातील पहिला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ प्रकल्प महाराष्ट्रात, पेंच व्याघ्र प्रकल्पात पाहता येणार आकाशाचे सौंदर्य

रात्रीच्या वेळी तारे पाहण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जावे लागू नये आणि आकाश निरीक्षणासाठी राखीव जागा आणि उद्याने तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ ची स्थापना...
देशातील पहिला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ प्रकल्प महाराष्ट्रात, पेंच व्याघ्र प्रकल्पात पाहता येणार आकाशाचे सौंदर्य

नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला ‘इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाकडून गेल्या काही वर्षात रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य जपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ने ही मान्यता दिली आहे. रात्रीच्या वेळी तारे पाहण्यासाठी मानवी वस्तीपासून दूर जावे लागू नये आणि आकाश निरीक्षणासाठी राखीव जागा आणि उद्याने तयार व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली आहे. याच संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ होण्याचा मान मिळवून दिला.

‘डार्क स्काय पार्क’ म्हणजे काय?

डार्क स्काय पार्क म्हणजे जिथे फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणची हवा प्रदूषणमुक्त असेल. त्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल. यात कोणताही बदल होऊ नये यासाठी या भागात प्रयत्न केले जातील. असा परिसर आकाश निरिक्षणसाठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो आणि त्याच भागाला ‘डार्क स्काय पार्क’ असे म्हटले जाते.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘डार्क स्काय पार्क’ हा आशियातला पाचवा प्रकल्प आहे.  याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पेंच प्रकल्पाला ‘डार्क स्काय पार्क’ची परवानगी मिळाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून पेंच व्याघ्र प्रकल्पात रात्रीच्या वेळी आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र वेधशाळा उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. प्रकाशाचे प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातील. तसेच या डार्क स्काय प्रकल्पाबाबत स्थानिकांना माहिती दिली जाईल. तसेच याबाबत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या व्याघ्र प्रकल्पातील सिलारी बफर झोनपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोलीमध्ये आणखी एक दुर्बीण बसवली जाणार आहे.

पृथ्वीची गुपिते उलगडणार

पृथ्वीची गुपिते उलगडू पाहणाऱ्या खगोलप्रेमींसाठी आता वाघांची भूमी ही नेहमीच प्रेरित करणारी असेल, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले. या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला ‘डार्क स्काय पार्क’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी अभिषेक पावसे व त्याचा भाऊ अजिंक्य पावसे या हौशी खगोलप्रेमी तरुणांनी प्रयत्न केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in