

मुंबई : महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. मात्र एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषित करत आहेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सपकाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव असून तो जनतेने ओळखावा, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे.
राज्याचे मत्स्यपालन व बंदर विकास मंत्री नितेश राणे प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्याबाबत सपकाळ म्हणाले की, राणे हे मटन कोणाकडून घ्यायचे व कोणाकडून घ्यायचे नाही हे जाहीरपणे सांगत आहे. कोणी काय खावे व कोणाकडून काय विकत घ्यावे हे सांगण्याचा अधिकार ह्या मंत्र्याला कोणी दिला? हलाल, झटका, किंवा आणखी काय हे जनतेला ठरवण्याचा अधिकार आहे, हे मंत्र्यांचे काम नाही. अशी जाहीर विधाने करून राणे हे समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. याआधीही नितेश राणे यांच्या काऱ्यकर्त्यांनी कणकवलीमध्ये शेख अशरफ या तरुणाला "जय श्रीराम" म्हणत मारहाण केली, याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देऊनही कारवाई केली जात नाही. राणे धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून दंगली भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असे सपकाळ म्हणाले.
बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज संविधान आणि कायद्याला पायदळी तुडवून सातत्याने प्रक्षोभक, भडकाऊ व हिंदू मुस्लीम अशी गरळ ओकत आहेत, त्याला मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का? आणि नसेल तर राणेंची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा.
- हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी