साताऱ्यात १० पंचायत समित्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांना प्रत्येकी ५, शिवसेनेला १ सभापतीपद; राष्ट्रवादीच्या तिघांचा भाजपमध्ये प्रवेश

सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी सोमवारी पार पडल्या. या निवडीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ला एक सभापतीपद मिळाले.
साताऱ्यात १० पंचायत समित्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व; दोघांना प्रत्येकी ५, शिवसेनेला १  सभापतीपद; राष्ट्रवादीच्या तिघांचा भाजपमध्ये प्रवेश
Published on

रामभाऊ जगताप /कराड

सातारा जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडी सोमवारी पार पडल्या. या निवडीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच, तर शिवसेना (एकनाथ शिंदे गट)ला एक सभापतीपद मिळाले. फलटणमध्ये निवडीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर फलटण पंचायत समितीत भाजपाचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती अशी निवड झाली.

माण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ईश्वर चिठ्ठीची साथ मिळाल्याने भाजप नेते जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला आहे. तर कराड पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला आहे. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीदरम्यान सर्वाधिक नाट्यमय घडामोडी फलटणमध्ये पाहायला मिळाल्या. येथे भाजपाच्या शिवांजली भोसले यांची सभापतीपदी आणि शिवसेनेच्या अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून या निर्णयाचे पक्षांतर्गत पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फलटणचे आमदार सचिन कांबळे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार असले तरी ते माजी खासदार व भाजप नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

पंचायत समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असतानाही त्यांनी ती संधी गमावली. दुसरीकडे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सभापतीपद भाजपाकडे खेचत राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ खेळल्याचे बोलले जात आहे. या घडामोडीनंतर आमदार सचिन कांबळे-पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही कारवाई होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता राहिलेल्या कराड पंचायत समितीवर भाजपाने पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली. कराड दक्षिण आणि उत्तरमध्ये १३ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. परिणामी कराड दक्षिणेतील नंदा यादव यांची सभापतीपदी आणि कराड उत्तरमधील अनिता वेताळ यांची उपसभापतीपदी निवड झाली.

सातारा जिल्ह्यातील सभापतीपदांची पक्षनिहाय स्थिती

  • कराड - भाजप

  • पाटण - शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

  • माण - राष्ट्रवादी काँग्रेस

  • खटाव - भाजप

  • फलटण - भाजप

  • कोरेगाव - राष्ट्रवादी काँग्रेस

  • सातारा - भाजप

  • वाई - राष्ट्रवादी काँग्रेस

  • जावली - भाजप

  • खंडाळा - राष्ट्रवादी काँग्रेस

  • महाबळेश्वर - राष्ट्रवादी काँग्रेस

logo
marathi.freepressjournal.in