मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्सच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ४ हजार ७६९ पैकी ४ हजार १६५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या पाचव्या परीक्षेचा निकाल ८७ टक्के लागला आहे. पहिल्या परीक्षेचा निकाल ९६ टक्के आणि दुसऱ्या परीक्षेच्या निकाल ९३ टक्के, तिसऱ्या परीक्षेचा निकाल ८९ टक्के आणि चौथ्या परीक्षेचा निकाल ८६ टक्के लागला होता.
पाचव्या परीक्षेला ४ हजार ७६९ उमेदवार बसले होते आणि ४ हजार १६५ यशस्वी झाले आहेत. यात ३ लाख ५५३ पुरुष आणि ६१२ महिलांचा समावेश आहे. यापैकी १९६ उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून यात १२ महिला आहेत. या निकालात मुंबईच्या शरद मोटा आणि पुण्याच्या दिवेश माहेश्वरी या दोघांनी १०० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे.
आतापर्यंत झालेल्या पाचही परीक्षांमधून १३ हजार ३७० उमेदवार एजंट्ससाठी पात्र ठरले आहेत. यात आताच्या परीक्षेत ४ हजार १६५, पहिल्या परीक्षेत ४०५ आणि दुसऱ्या परीक्षेत २ हजार ८१२, तिसऱ्या परीक्षेत ४ हजार ४६१ आणि चौथ्या परीक्षेत १ हजार ५२७ असे एकूण १३ हजार ३७० उमेदवार पात्र ठरले आहेत. महारेराने १० जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये एजंट्सच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे.
राज्यात सुमारे ४७ हजार एजंट्स नोंदणीकृत होते. यापैकी १३ हजार ७८५ एजंट्सनी नूतनीकरण न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर एप्रिलअखेर महारेराने २० हजारपेक्षा जास्त एजंट्सनी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविण्याच्या अटींची ३१ डिसेंबरपर्यंत पूर्तता केली नाही, म्हणून त्यांची नोंदणी स्थगित करून त्यांना काही अटींसापेक्ष या क्षेत्रात काम करायला बंदी घातलेली आहे.
मुंबई, पुण्याची बाजी
-मुंबई आणि पुण्याच्या दोघांनी १०० टक्के गुणांसह मिळवले संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान
-निकालात ६९ वर्षांवरील १९६ उमेदवारांत १२ महिला तर एकूण ४१६५ उमेदवारांत ६१२ महिला उमेदवारांचा समावेश
-आतापर्यंत एकूण १३,३७० उमेदवार एजंट्स होण्यास पात्र ठरले आहेत.