संभाजी भिडेंविरोधात महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी आक्रमक ; तक्रार दाखल करत केली अटकेची मागणी

संभाजी भिडेंनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी महात्मा गांधींच्या आई वडिलांवर टीका केली असल्याचं तुषार गांधी या तक्रारीत म्हटलं आहे.
संभाजी भिडेंविरोधात महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी आक्रमक ; तक्रार दाखल करत केली अटकेची मागणी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांनी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर भिडेंवर अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आता भिडे यांच्या वक्तव्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी हे आक्रमक झाले आहेत. तुषार गांधी यांनी भिंडेंच्या विरोधात पुणे येथे तक्रार दिली आहे. यामुळे मनोहर उर्फ संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी तुषार गांधी यांच्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ असिम सरोदे हे देखील होते. संभाजी भिडेंच्या बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर असल्याचा आरोप यावेळी तुषार गांधी यांच्याकडून करण्यात आला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक बोलतात आणि बाहेर दुसरं बोलतात, असं तुषार गांधी यावेळी म्हणाले.

यावेळी तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. संभाजी भिडेंनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी महात्मा गांधींच्या आई वडिलांवर टीका केली आहे. आमचा न्याव्यवस्थेवर विश्वास असून भिडेंवर कारवाई होईल, अशी अपेक्षा तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे.

कायदे तज्ञ असिम सरोदे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी कलम ४९९ नुसार अब्रु नुकसान करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, कलम १५३ (अ) समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, कलम ५०५ गुन्हेगारी स्वरुपाचा खोळसाळपणा करणे, हे गुन्हे दाखल करण्याची मागमी केली असल्याचं सांगितलं. तसंच या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा नोंद करु असं पोलिसांनी सांगितलं असल्याचंही सरोदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in