मुंबर्इ : महाविकास आघाडी अभेद्य आणि मजबूत असून राज्यातील सर्व लोकसभा जागा एकत्रितपणे लढणार आहे अशी घोषणा उबाठा शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी गुरुवारी केली. महाविकास आघाडी नेत्यांच्या जागावाटप बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राउत पुढे म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे धोरण ठरवण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीत सर्व जागा एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाला आहे. आघाडीतील घटक पक्ष प्रत्येक जागा स्वताची आहेत असे समजूनच अधिकाधिक जागा जिंगण्याचा प्रयत्न करणार आहेत. जागावाटप संबंधिची पुढील बैठक ३० जानेवारी रोजी होणार आहे. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीत आता उबाठा शिवसेना, कॉंग्रेस आणि शरदपवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असे तीन घटक पक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना अधिकृत निमंत्रण पाठवण्यात आले आहे. फोनवरुन चर्चा देखील झाली आहे. महाविकास आघाडीच्या दिल्लीतील नेत्यांनी देखील फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती राउत यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की आमची स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत देखील चर्चा सुरु आहे. राज्यातील प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची असेल.
प्रत्येक जागा लढू आणि आम्ही जिंकू हाच आमचा फॉर्म्युला आहे असेही राउत यांनी सांगितले. याबाबत आमची तपशीलवार चर्चा झाली आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांचा पक्ष राज्यातील ४८ जागापैकी २० ते २१ जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. ३० जागांबाबत काहीच वाद नाही. उदहारणार्थ बारामती शरद पवार गटाला मिळेल, नागपूर कॉंग्रेस पक्षाला तर कोकणातील काही जागा उबाठा शिवसेनेला जातील, असे या नेत्याने सांगितले आहे. १८ जागांसाठी चर्चा होर्इल. यात रामटेक, हिंगोली, शिर्डी, यवतमाळ, भिवंडी, मुंबर्इ उत्तर मध्य, मुंबर्इ दक्षिण मध्य, आणि मुंबर्इ उत्तर -पश्चिम या जागांचा समावेश आहे. या जागा २०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने लढवल्या होत्या. मात्र या जागा तेव्हा शिवसेनेने जिंकल्या होत्या. आम्हाला या जागा हव्या आहेत पण शिवसेना म्हणते गेल्या वेळी आम्ही या जागा जिंकल्या आहेत. पण या जागांवर निवडून आलेले खासदार आता शिंदे गटात आहेत. आता आम्ही अधिक जागा मिळवण्यावर आग्रही नाही तर उत्तमप्रकारे निवडणूक लढून जिंकण्यासाठी आग्रही आहोत. कॉंग्रेस नेते पुढे म्हणाले की २०१९ साली अमरावतीची जागा एनसीपीला देण्यात आली होती. पण स्वतंत्र उमेदवार नवनीत राणा या एनसीपीच्या पाठिंब्यावर ही जागा जिंकल्या होत्या.
त्या देखील आता एनडीएत आहेत. एनडीएत आता शिंदे शिवसेना, अजितपवार राष्ट्रवादी या पक्षांचाही समावेश आहे. सांगलीवर आता एनसीपी दावा सांगत असली तरी या मतदार संघासाठी आमचा उमेदवार तयार आहे असे कॉग्रेसच्या या नेत्याने सांगितले आहे. लवकरच प्रकाश आंबेडकर देखील महाविकास आघाडीचा घटक असेल असेही या कॉंग्रेस नेत्याने सांगितले आहे.