महाविकास आघाडीत जागावाटपाची तिढा सुटेना; चर्चेला गती मिळेना, दावे-प्रतिदावे सुरूच

जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याअगोदरच ठाकरे गटाने एक-एक उमेदवार निश्चित करण्यात आघाडी घेतली आहे.
महाविकास  आघाडीत जागावाटपाची तिढा सुटेना; चर्चेला गती मिळेना, दावे-प्रतिदावे सुरूच

राजा माने/मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे दाखविले जात आहे. मात्र, जागावाटपाला अद्याप गती आलेली नाही. त्यातच वंचित विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर सातत्याने जागावाटपावरून डिवचत आहेत. अशा स्थितीत अंतर्गत बोलणी पुढे सरकताना दिसत नाही. तथापि, काही जागांवर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. शरद पवार गटाने वर्धा आणि रामटेकवर दावा सांगितला आहे. त्यातच इतर बऱ्याच जागांवरून एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

भाजपने आता लोकसभेची तयारी केलेली असून, त्यांचे जवळपास उमेदवार निश्चित आहेत. मात्र, महायुतीतही जागावाटपाचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. त्यात अजित पवार गटाला किती आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार, यावरून प्रश्न कायम आहे. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपात आधीच आघाडी घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते लवकर जागावाटप करून प्रश्न मार्गी लावतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जवळपास ३४ जागांवर एकमत झाल्याचेही बोलले जात होते. परंतु चर्चेचे गुऱ्हाळ त्याच्या पुढे सरकताना दिसत नाही. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांपासून बैठकही होत नाही. त्यातच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या सोयींनुसार दावे करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते हा प्रश्न मार्गी कसा लावतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जागावाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याअगोदरच ठाकरे गटाने एक-एक उमेदवार निश्चित करण्यात आघाडी घेतली आहे. आतापर्यंत जवळपास ११ उमेदवार निश्चित केले आहेत. जिथे ठाकरेंची ताकद जास्त आहे, त्या जागेवरील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवार निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाची गाडी हळूहळू पुढे सरकताना दिसत आहे.

त्यातच काही जागांवरून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष दावा करीत आहेत. त्यामध्ये नाशिक, रामटेक, अमरावती, कोल्हापूर यासह अन्य जागांवर ही रस्सीखेच सुरू आहे. नाशिक ठाकरे गटाची हक्काची जागा असताना तिथे शरद पवार गटाने दावा केला आहे. आता रामटेकदेखील ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा असताना तिथे शरद पवार गटानेही दावा केला आहे. याशिवाय अमरावतीतही ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा आहे. कोल्हापुरातही सक्षम उमेदवाराचा विषय मांडत छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. यातून दिवसेंदिवस गुंतागुंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते तत्काळ बैठकांचे सत्र सुरू करून हा विषय लवकर मार्गी लावणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वंचितच्या अटींवर अटी

एकीकडे महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असताना वंचित आघाडीचे अजूनही तळ्यात-मळ्यातच सुरू आहे. वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे सातत्याने अटी समोर ठेवून मगच महाविकास आघाडीत सामिल होऊ, असे सांगत आहेत. आता तर त्यांनी ३९ मुद्यांचा प्रस्ताव समोर ठेवला असून, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचा प्रश्न यासह इतर महत्त्वाचे मुद्दे यात मांडले आहेत. या मसुद्यावर आघाडीच्या नेत्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

काँग्रेस प्रभारी ठाकरेंच्या भेटीला

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने आता काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीमध्ये जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा केल्याचे समजते. ठाकरे गट आणि काँग्रेस आठ जागांसाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे तिढा सुटत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, वंचित आघाडीकडून सातत्याने अटी घातल्या जात असल्याने त्यांच्याबद्दल संभ्रम वाढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in