महायुतीचा निवडणूक 'धुमधडाका'; मकरसंक्रांतीआधी 'लाडक्या बहिणीं'च्या खात्यात पैसे होणार जमा

मुंबईसह राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यातच महायुतीने महिला वोटर कार्ड खेळले आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या १४ जानेवारीपूर्वी ३ हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.
महायुतीचा निवडणूक 'धुमधडाका'; मकरसंक्रांतीआधी 'लाडक्या बहिणीं'च्या खात्यात पैसे होणार जमा
महायुतीचा निवडणूक 'धुमधडाका'; मकरसंक्रांतीआधी 'लाडक्या बहिणीं'च्या खात्यात पैसे होणार जमा
Published on

मुंबई : मुंबईसह राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून यातच महायुतीने महिला वोटर कार्ड खेळले आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या १४ जानेवारीपूर्वी ३ हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.

मकरसंक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून सरकारने महिलांना ही ओवाळणी देण्याचे निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, यावेळी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार असल्याने महिलांच्या खात्यात एकदम ३ हजार रुपये जमा होतील. सणासुदीच्या काळात हा आर्थिक आधार महिलांसाठी मोठी भेट ठरणार आहे. 'लाडकी बहीण' योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, दिलेल्या मुदतीपर्यंत २ कोटी ४७ लाखांपैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, मकरसंक्रांतीच्या आधी सरकारने खात्यात पैसे पाठवले तर बहिणींची मते सरकारच्या बाजूने पडण्याची शक्यता आहे.

श्रेयवादाची लढाई : 'भाऊ' की 'देवाभाऊ'?

लाडक्या बहिणी योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयाची लढाईही पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला 'लाडका भाऊ' म्हणून प्रोजेक्ट करत असताना, भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'देवाभाऊ' असा केला आहे. "देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची भेट," अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आणि फडणवीस समर्थकांमध्ये एक प्रकारे 'क्रेडिट वॉर' सुरू झाले आहे.

लाडकी बहीण योजना पुन्हा 'गेम चेंजर' ठरणार

शिवसेना (ठाकरे गट) सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर दहिसर भागातून निवडणूक लढवत आहेत. या घोषणेद्वारे महिला मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेच्या सत्तेसाठी 'लाडकी बहीण' योजना महायुतीसाठी 'गेमचेंजर' ठरू शकते, असा महायुतीच्या नेत्यांना आत्मविश्वास वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रचारसभेत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख आवर्जून केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in