विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? भाजप १५५, शिवसेना ६५, राष्ट्रवादी ५५ जागा लढवणार?

विधासभेसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे.
विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? भाजप १५५, शिवसेना ६५, राष्ट्रवादी ५५ जागा लढवणार?

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी आपलं लक्ष विधानसभा निवडणूकीवर केंद्रीत केलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप नेमकं कसं होणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलं आहे. दरम्यान विधासभेसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप १५५ जागा, शिवसेना शिंदे गट ६५ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ५५ जागा लढवू शकतो. दरम्यान याबाबत महायुतीकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला फक्त १७ जागा जिंकता आल्या. यामध्ये भाजपनं ९, शिवसेना शिंदे गटानं ७ तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ १ जागा जिंकता आली. त्याचवेळी महाविकास आघाडीनं मोठं यश संपादन केलं. आता येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून तयारी सुरु झाली आहे. लोकसभेतील यशानंतर महाविकासआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मनोधर्य उंचावल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचवेळी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र आहे. दरम्यान विधानसभा निवडणूकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आलंय. यानुसार भाजप दीडशे पेक्षा जास्त जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप १५५ जागा, शिवसेना शिंदे गट ६५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ ५५ जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे. दरम्यान माध्यमांमध्ये या फॉर्म्युल्याची चर्चा होत असली तर, महायुतीकडून या फॉर्म्युलाला कोणताही दुजोरा दिला गेला नाही.

दरम्यान काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ८५-९० जागा दिल्या जाव्यात, अशी मागणी केली होती. दरम्यान शिंदे गटाच्या नेत्यांकडून जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी सातत्यानं वक्तव्य केली जात आहे. अशा परिस्थितीत १५५-६५-५५ फॉर्म्युल्याचं पुढं काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in