
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येताच महायुतीत सर्वश्रेष्ठ कोण, यात चढाओढ सुरू आहे. त्यात १०० दिवसांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विभाग आणि शिवसेनेचे मंत्री असलेले विभाग असे एकूण पाच विभाग अग्रेसर असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना १०० दिवसांच्या कार्यक्रमात बाजी मारणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
उत्कृष्ट कामगिरी, विभागात स्वच्छता, कामाची प्रगती यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे मूल्यमापन सुरू असून ६० विभागांची उत्तम कामगिरी असल्याचे निदर्शनास आले आहे. ६० पैकी ८ विभागांची निवड केली असून यापैकी तीन विभागांची उत्कृष्ट कामगिरी म्हणून निवड करण्यात येणार आहे. या ८ पैकी एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील ४ विभागांची उत्तम कामगिरी असल्याचे समजते. त्यामुळे १०० दिवसांच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील विभाग व त्यांच्या मंत्र्यांच्या अखत्यारित असलेले विभाग बाजी मारणार, अशी चर्चा असली तरी लवकरच याबाबत निकाल जाहीर होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताच सर्वप्रथम राज्य सरकारच्या अखत्यारितील सर्वच विभागातील कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा आखून दिला आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कामगिरीच्या मूल्यमापनाची ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शंभर दिवसांच्या आढाव्यात मंत्रालयातील आठ विभागांची कामगिरी अव्वल असल्याचे केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीकडून केलेल्या मूल्यमापनात स्पष्ट झाले. या ऑडिटमध्ये एकूण ६० विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. आता या आठ विभागांतून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. येत्या आठवडाभरात महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारे तीन विभाग कोणते, याचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. तर इतर विभागांना कलर कोड देऊन कामगिरी सुधारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. या विभागांची ग्रीन झोन, यलो झोन आणि रेड झोन अशी विभागणी केली जाईल. चांगली कामगिरी असणारे विभाग ग्रीन झोनमध्ये, मध्यम कामगिरी असणारे विभाग यलो झोनमध्ये आणि खराब कामगिरी असणारे विभाग रेड झोनमध्ये अशा प्रकारे ही वर्गवारी असेल, असे सांगण्यात आले.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने चांगल्या कामगिरीमुळे निवड केलेल्या खात्यांच्या यादीत शिंदे गटाचा वरचष्मा दिसून येतो. या आठ विभागांमध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असणारे पाच विभाग, भाजपचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केवळ एका विभागाचा समावेश आहे. त्यामुळे आता या तिघांपैकी कोणत्या पक्षाचा विभाग अव्वल ठरणार, हे बघावे लागेल.
या विभागाची आगेकूच शिंदेंची शिवसेना
सार्वजनिक बांधकाम विभाग - एकनाथ शिंदे
परिवहन विभाग - प्रताप सरनाईक
गृहनिर्माण विभाग - एकनाथ शिंदे
सार्वजनिक आरोग्य विभाग - प्रकाश आबिटकर
उद्योग विभाग - उदय सामंत
भाजप
ऊर्जा विभाग - देवेंद्र फडणवीस
ग्रामविकास विभाग - जयकुमार गोरे
अजित पवारांची राष्ट्रवादी
महिला व बालविकास विभाग - आदिती तटकरे