मुंबई : महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात महिला अत्याचार, भ्रष्टाचार फोफावला आहे. दसरा मेळाव्याच्या भाषणात बाळासाहेब म्हणाले होते की, महिलांची छेड काढली, तर कानाखाली आवाज काढा, ते शब्द आजही आठवतायत. गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी, महिला सुरक्षा याबाबत जनजागृती मोहीम राबवा. आपल्याला पुढील दोन-तीन महिन्यांत महाभ्रष्ट महायुतीचे विसर्जन करायचे आहे, असा एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
श्री गणेशोत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना रंगशारदा येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये येणार आहेत, ते बदलापूरच्या घटनेवर बोलतात की बंगालच्या घटनेवर, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.
भाजपने इंग्रजांची वृत्ती स्वीकारली आहे. समाजात आग लावण्याचे काम हे करत आहेत. घराघरात माता-भगिनी आहेत, महिला कामावर जात असताना तिच्या सुरक्षेची जबाबदारी आपली हे समजून घ्या. बहीण सुरक्षित, तर घर सुरक्षित. मात्र महायुती सरकारला काही देणं-घेणं नाही. त्यामुळे आपण गणपती बाप्पाची वाट बघत असून, बाप्पा यांना बुद्धी दे, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. अडीच वर्षांत जनतेने खूप सहन केले, आता गणेशोत्सवात महायुतीचे विसर्जन करायचे हेच ध्यानी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
मणिपूरबद्दल राष्ट्रपती बोलल्या असत्या, तर अशा घटना घडल्या नसत्या
कोरोनामुळे गेल्या काही वर्षांत आपल्याला भेटता आले नाही. त्यामुळे आपल्यात अंतर पडले असे नाही. गणेशोत्सव हा सामाजिक बांधिलकी जपणारा सण आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत महिला सुरक्षा यावर जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. बंगाल येथील घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पहिल्यांदा बोलल्या ही चांगली गोष्ट आहे. मात्र, मणिपूरमध्ये घटना घडली त्यावेळी त्या बोलल्या असत्या तर अशा घटना घडल्याच नसत्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मूर्मू यांना लगावला.
प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्तांच्या डोक्यावर बसा
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, सांडपाण्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम, पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही, या सगळ्यांचा जाब विचारण्यासाठी अनिल परब, सुनील प्रभू आयुक्तांना भेटा, त्यांच्या डोक्यावर बसा आणि बाप्पाच्या आगमनाआधी हे प्रश्न सोडवतो अशी हमी घ्या, असेही ते म्हणाले.
‘जोडे मारो’ आंदोलनात सहभागी व्हा - सुनील प्रभू
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान, तसेच महायुतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात रविवारी गेटवे ऑफ इंडिया येथे महायुतीविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या ‘जोडे मारो’ आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.