अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असल्याची घोषणा माध्यमांसमोर केली होती.
अखेर ठरले! महायुतीने ठाण्यातून शिंदे गटाचे शिलेदार नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना दिली उमेदवारी

मुंबई : महायुतीमधील ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीने आज (१ मे) कामगार दिनाचे औचित्य साधत ठाणे आणि कल्याण मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यात माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे मतदरासंघातून उमेदवारी दिली आहे. तर, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असल्याची घोषणा माध्यमांसमोर केली होती. त्यामुळे आज श्रीकांत शिंदे यांच्या नावची घोषणा म्हणजे औपचारिकता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा गड राखण्यात यश आले आहे. परंतु, ठाणे आणि कल्याण हे दोन्ही गड निवडणुकीत शिंदे गट राखणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

शिवसेनेने त्यांच्या एक्स (आधीचे ट्विटर) ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या नावची घोषणा केली आहे. ठाणे मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे विरूद्ध महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यात चुरेशी लढत होणार आहे. तर, दुसऱ्या बाजूला कल्याण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे विरूद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या दोघांत लढत होईल.

ठाणेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच

ठाणे मतदारसंघावर शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षाने दावा केला होता. ठाणे मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून संजय केळकर लढण्यास इच्छुक होते. तर, शिंदे गटात माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. या इच्छुक उमेदवारांमुळे महायुतीचे जागावाटप लांबणीवर पडल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांची इच्छुकांसोबत बैठक

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवार माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत मंगळवारी (३० एप्रिल) बैठक घेतली. ही बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in