प्रतिनिधी/मुंबई
दक्षिण मुंबई या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघासाठी महायुतीला अद्यापही उमेदवार मिळत नाही, असे चित्र आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानण्यात येतो. विद्यमान खासदार अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटातच आहेत. त्यामुळे अपेक्षेनुसार महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून अरविंद सावंत यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. मात्र महायुतीकडून इथला उमेदवार कोण, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदारसंघात फिरायला लागले आहेत. विविध ठिकाणी भेटीगाठीही सुरू आहेत. पण त्यांचे नाव अद्यापही अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले नाही. कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाचीही आधी चर्चा सुरू होती. महायुतीत भाजपला हा मतदारसंघ न सुटला तर नुकतेच शिंदे गटाकडून राज्यसभेवर पाठविण्यात आलेल्या मिलिंद देवरा यांच्याही नावाची या मतदारसंघासाठी चर्चा सुरू आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्यातच दक्षिण मुंबई या मतदारसंघातच सर्व प्रमुख राजकीय, प्रशासकीय तसेच आर्थिक संस्थांची कार्यालये आहेत. मंत्रालय-विधानभवनापासून ते मंत्रयांचे बंगले, रिझर्व्ह बँक, विविध देशांच्या एम्बसी, महत्त्वाच्या बँका, आर्थिक संस्थांची प्रमुख कार्यालये या मतदारसंघात येतात. सोबतच परळ-लालबागसारखा गिरणगावाचा परिसरही येतो. गुजराती भाषिक मतदारदेखील या भागात आहेत. मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. पण या मतदारसंघावर मराठी मतदारांचाच प्रभाव आहे. विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होते. मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत. कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे राहुल नार्वेकर करत आहेत. भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या होत्या, त्या आता शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल आमदार आहेत. शिवडीतून ठाकरे गटाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार आहेत.
शिवसेनेचे आणि सध्या ठाकरे गटात असलेले खासदार अरविंद सावंत यांनी सलग दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. २०१४ आणि २०१९ असे सलग दोनदा अरविंद सावंत यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे साहजिकच महाविकास आघाडीकडून त्यांना यावेळीही उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपला ही जागा हवी आहे. सुरूवातीला कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे नाव चर्चेत होते. मात्र या मतदारसंघात मराठी उमेदवारच द्यावा लागेल हे दिसून आल्याने नंतर राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राहुल नार्वेकर यांचा कुलाबा विधानसभा मतदारसंघही यातच येतो. त्यामुळे गेले काही दिवस राहुल नार्वेकर हे कामाला लागले आहेत.
दरम्यानच्या काळात मनसे महायुतीत येणार अशी चर्चा सुरू होती. तेव्हा मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्यात येणार, अशीही चर्चा होती. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मनसेला हा मतदारसंघ सुटण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे भाजप जर हा मतदारसंघ लढविणार असेल तर सध्यातरी राहुल नार्वेकर यांनाच उमेदवारी मिळेल, अशीच शक्यता जास्त आहे.