विशेष प्रतिनिधी/मुंबई
राज्यात महायुती मजबूत झाली आहे. भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मोठा गट गेल्याने महायुतीने आगामी लोकसभेसाठी मिशन ४५ चा नारा दिला आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या पुढे आता महायुतीत चांगलीच धुसफूस सुरू आहे. या अगोदर जागा वाटपावरून मतभेद उफाळून आले, तेव्हा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधले गेलेले नाही, असा हिसका दाखविला. तिकडे नाशिकमध्ये मंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक बोलावली. या बैठकीला भाजप आणि राष्ट्रवादीच्या मित्रपक्षांनी अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळे वरून युती मजबूत असल्याचे दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात ठिकठिकाणी अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात एक समिती नेमली असून, दादा भुसे या समितीचे सहअध्यक्ष आहेत. त्यांनी ही आढावा बैठक बोलावली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. परंतु या बैठकीला भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी अनुपस्थिती दर्शविली. त्यामुळे नाशिकमध्ये महायुती मजबूत असली, तरी सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. या अगोदरही पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली होती, त्यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अनुपस्थित होते. त्यावरून जिल्ह्यात तिन्ही पक्षांत समन्वय नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी नाशिकचे पालक मंत्री दादा भुसे यांना आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भुसे यांनी ही आढावा बैठक बोलावली होती.
नाशिक जिल्ह्यात भाजपचे ५ आमदार आहेत. त्यामध्ये देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, राहुल अहिरे, दिलीप बोरसे यांचा समावेश आहे. यासोबतच राष्ट्रवादीचीदेखील ताकद मोठी असून, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही दांडी मारली होती. एवढेच नव्हे, तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बैठक बोलावली असताना शिंदे गटाचेच आमदार सुहास कांदे हेही अनुपस्थित होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्व काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, खा. हेमंत गोडसे, जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार हिरामन खोसकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नरहरी झिरवाळ, नितीन पवार हे मात्र उपस्थित होते. परंतु महायुतीचे बहुतांशी नेते अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.