महायुतीतील बंडोबा झाले थंड; फडणवीसांची चाणक्य नीती आली कामी

‘सागर’ बंगल्यावर रोजच नेते, पदाधिकाऱ्यांची गर्दी आहे. याअगोदर फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या विशेषत: नाराज भाजप नेत्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा मार्ग सुकर झाला. बारामती मतदारसंघातील हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांची समजूत घातल्याने तेथील प्रश्नही आता मार्गी लागला आहे.
महायुतीतील बंडोबा झाले थंड; फडणवीसांची चाणक्य नीती आली कामी

विशेष प्रतिनिधी/मुंबई

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीचा समावेश झाल्याने अनेक ठिकाणी नाराजीचा सूर आणि बंडाचे निशाण फडकवले गेले. परंतु महायुतीच्या नेत्यांनी विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणक्य नीतीचा वापर करीत अनेक मतदारसंघांतील बंडोबांना थंड केले. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे प्रचंड नाराज होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अडचण निर्माण झाली होती. या दोघाही बंडखोरांशी संवाद साधून फडणवीस यांनी त्यांना शांत केले. आता ते माढ्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगण्यात येते.

महायुतीत काही जागांवरून अजूनही तिढा आहे, तर काही ठिकाणी उमेदवार घोषित केल्याने काही इच्छुक नेत्यांची नाराजी आहे. तसेच काही उमेदवारांसोबत राजकीय मतभेद असल्याने नाराजी आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे जिथे नाराजी उद्भवली, तिथे महायुतीचा धर्म म्हणून स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत असून, संबंधित नेत्यांना ‘सागर’ बंगल्यावर किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून त्यांची समजूत घालण्याचे काम ते करीत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात ‘सागर’ बंगला घडामोडींचा केंद्रबिंदू बनला आहे.

हर्षवर्धन पाटील, शिवतारे नरमले

‘सागर’ बंगल्यावर रोजच नेते, पदाधिकाऱ्यांची गर्दी आहे. याअगोदर फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील महायुतीच्या विशेषत: नाराज भाजप नेत्यांची नाराजी दूर केली. त्यामुळे भाजपचे उमेदवार सुजय विखेंचा मार्ग सुकर झाला. बारामती मतदारसंघातील हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांची समजूत घातल्याने तेथील प्रश्नही आता मार्गी लागला आहे. आता माढ्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सूतोवाच फडणवीस यांनी केले.

माढात भाजपचे निंबाळकर संकटात

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील नाराज झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या विरोधात आता धैर्यशील मोहिते-पाटील यांना मैदानात उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकरही नाराज आहेत. त्यामुळे ते भाजपसमोर आव्हान उभे करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्याचे फडणवीस यांच्यासमोर आव्हान आहे.

धैर्यशील मोहिते ठाम

एकीकडे वाद मिटविण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यासाठी त्यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना ‘सागर’ बंगल्यावर बोलावून समजावून सांगितले. परंतु धैर्यशील मोहिते-पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा वाढला आहे.

शरद पवार देणार धक्का

शरद पवारदेखील माढ्यातील या वादावर लक्ष ठेवून आहेत. हा वाद मिटला नाही, तर धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हाती तुतारी देऊन त्यांना ते पाठबळ देऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपसाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळे फडणवीस पवारांना ही संधी मिळू नये म्हणून प्रयत्नशील आहेत.

logo
marathi.freepressjournal.in