राजन चव्हाण/सावंतवाडी
महायुतीतील घटक पक्षांमधील वाढत्या मतभेदांवर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने लवकरच वरिष्ठ नेत्यांची एकत्र बैठक घेऊन आपापसातील वाद मिटवले जातील, असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडीत दिले. “केंद्रातील एनडीए सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार २०२९ पर्यंत सुरळीत चालावे, हीच जनतेची आणि भाजपची अपेक्षा आहे,” असे म्हणत त्यांनी दोन्ही सरकारे जनहिताच्या आकांक्षा पूर्ण करतील याची ग्वाही दिली.
नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिंदे सेना-भाजप या महायुतीतील दोन पक्षांमध्ये निर्माण झालेली दुरावा, तसेच मतदानाच्या दिवशी सावंतवाडीत झालेल्या ‘राडा’नंतर चव्हाण यांचा दौरा विशेष महत्त्वाचा ठरत होता. जिल्हा भाजपने जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेकडे माध्यमांचे विशेष लक्ष होते. मात्र चव्हाण यांनी कोणतेही वादग्रस्त भाष्य न करता, राज्यातील महायुती सरकारच्या एका वर्षाच्या कारभाराचा आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक करण्यातच वेळ घालविला.
पत्रकार परिषदेच्या शेवटी, माध्यम प्रतिनिधींनी नगरपरिषद निवडणुकीतील वादांबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु चव्हाण यांनी उत्तर देण्याचे टाळत, “आपल्याला एक लग्नसमारंभाला जायचे आहे,” असे सांगत चर्चा झटपट आवरली. मात्र पुन्हा विचारल्यावर ते म्हणाले, “निवडणुका आल्या की निवडणुकीपुरताच खेळ खेळला जातो; निवडणुका संपल्या की सर्व विसरले पाहिजे.”
शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये करण्यात आलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’ व “२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची” या चव्हाण यांच्या विधानावरून व्यक्त केलेल्या नाराजीवरही आज कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असली तरी चव्हाण यांनी संपूर्ण वादावर मौन राखण्याचाच पर्याय निवडला.
महामार्गांना ठाम पाठिंबा ‘शक्तिपीठ महामार्गा’ला होत असलेल्या विरोधाकडे लक्ष वेधल्यावर चव्हाण म्हणाले, समृद्धी महामार्ग असो किंवा शक्तिपीठ महामार्ग दोन्ही विकासासाठी आवश्यक आहेत. दळणवळण वाढेल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल. राज्याच्या प्रगतीसाठी असे महामार्ग गरजेचे आहेत.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार?
राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण वाढत असल्याने ‘लाडकी बहीण’ योजना बंद होण्याची चर्चा असल्याबद्दल विचारल्यास त्यांनी स्पष्ट सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना आणि प्रकल्प पूर्ण करण्यास दोन्ही सरकारे कटिबद्ध आहेत. तसेच त्यांनी पुन्हा एकदा मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. महायुतीतील अंतर्गत मतभेद वाढत असताना, चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली असली तरी आगामी काळात होणारी वरिष्ठ नेत्यांची बैठक निर्णायक ठरणार आहे.