अजितदादांची नाराजी दूर करण्यात यश; राष्ट्रवादीला ७ तर शिवसेनेला ११ जागा?

केंद्रीय गृहमंमत्री अमित शाह यांनी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोजक्याच जागा देऊन अधिकाधिक जागा लढण्याची योजना आखली होती. परंतु...
अजितदादांची नाराजी दूर करण्यात यश; राष्ट्रवादीला ७ तर शिवसेनेला ११ जागा?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

केंद्रीय गृहमंमत्री अमित शाह यांनी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोजक्याच जागा देऊन अधिकाधिक जागा लढण्याची योजना आखली होती. परंतु यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही खदखद सुरू होती. त्यातच शिवसेनेला १३ जागा दिल्या जातील, असे सांगितले जात होते. परंतु आता त्यांना ११ जागा देण्याची योजना आखली आहे. परंतु राष्ट्रवादीला आता ७ जागा देण्याचे मान्य केले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या अगोदर राष्ट्रवादीला तीनच जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु आता नव्या फॉर्म्युल्यात त्यांना ७ जागा मिळू शकतात. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याचे बोलले जात आहे.

नव्या सूत्रानुसार भाजप ३० जागांवर निवडणूक लढवू शकते, तर शिंदे गटाला ११ आणि अजित पवार गटाला ७ जागा मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीला जागा वाढवून देऊन त्यांची नाराजी दूर केल्याचे समजते. त्यामुळे आता महायुतीचे जागावाटप येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होऊ शकते. लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. त्यात महायुतीतील मोठ्या पक्षांच्याच जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने छोट्या-छोट्या मित्रपक्षांकडे भाजपचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे छोट्या मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेण्याचे काम भाजपने केले आहे.

त्यामुळे काही मित्रपक्षांनी आता महायुतीवरच प्रहार करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यातील काही जिल्ह्यांत ताकद मोठी आहे. परंतु त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकच खासदार असल्याने ३ पेक्षा अधिक जागा द्यायला भाजप तयार नव्हता. परंतु भाजपने संख्याबळ आणि जिंकून येण्याची क्षमता पहात राष्ट्रवादीने किमान ९ जागांची मागणी केली. परंतु भाजपने राष्ट्रवादीला आता ७ जागा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला आता सन्मानजनक जागा मिळाल्याचे बोलले जात आहे. या अगोदर भाजपने मोजक्याच जागा देण्याची तयारी दाखवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कांँग्रेस आणि शिवसेनेत नाराजी होती. त्यामुळे यांनी सातत्याने दबावतंत्राचा वापर केला. यातूनच दिल्लीत होणाºया दोन बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर चर्चा होण्याअगोदरच आता नवा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबत बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु शिंदे गटाच्या दोन जागा कमी होत असल्याने शिवसेना हा फॉर्म्युला मान्य करणार का, हाही प्रश्न आहे. अगोदरच भाजप मुंबईत ५ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे शिवसेनेला एका जागेवर पाणी सोडावे लागू शकते. त्यात आणखी एक जागा कमी झाल्यास शिंदे गटात नाराजीचा सूर उमटू शकतो, असेही बोलले जात आहे. त्यामुळे बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार या ७ जागा

राष्ट्रवादीला केवळ ३ ते ४ जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली होती. त्यामुळे अजित पवार गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच किमान ९ जागा दिल्या जाव्यात, अशी मागणी लावून धरली होती. परंतु भाजप नेते आपल्या भूमिकेवर ठाम होते. तथापि, राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता ७ जागा देण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या जागांमध्ये बारामती, शिरुर, रायगडसह सातारा, गडचिरोली, धाराशिव, परभणी लोकसभा मतदारसंघांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यामुळे भाजपच्या नेत्यांची नाराजी वाढण्याची शक्यता आहे. कारण यापैकी बऱ्याच जागांवर भाजपनेही दावा केलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in