विशेष प्रतिनिधी/मुंबई
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत सर्वांत मोठे बंड घडवून आणले आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेबाहेर खेचून राज्यात महायुतीचे सरकार आणले. हे सर्व शिंदे यांच्या धाडसी बंडामुळे शक्य झाले. अर्थात, त्याचे बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीचा मोठा गटही सत्तेत आला. त्यामुळे महायुती मजबूत झाली. परंतु आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या पुढे शिंदे गटालाच घेरण्याचा महायुतीत प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे. विद्यमान खासदारांना जागा देण्याचे आधीच ठरले असताना, आता शिंदे गटाचे खासदार असलेल्या मतदारसंघावर भाजपने दावा ठोकल्यामुळे शिंदे गटाचे खासदार आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंड केले, त्यावेळी तब्बल ४० आमदार शिंदेंसोबत गेले. त्याचबरोबर शिवसेनेच्या १८ पैकी तब्बल १३ खासदारांनी शिंदेंना साथ दिली. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे बळ वाढले. या दरम्यान, काही माजी खासदार आणि माजी आमदार, विधान परिषदेचे आमदारही सोबत आले. या पाठीमागे राजकीय भवितव्याचीच चिंता प्रत्येकाला होती. त्यामुळे राज्यात शिंदे यांची शिवसेना प्रबळ झाली. परंतु लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच, जागावाटपावरून शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांसह प्रमुख नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याची पहिली ठिणगी गजानन कीर्तीकर यांच्या रूपाने पडली. त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल करत, ‘आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही. लोकसभेचे सन्मानाने जागावाटप झाले पाहिजे,’ असा सूर आळवला. त्यानंतर शिवसेनेच्या १८ जागांचा प्रस्ताव भाजपकडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात वेगळेच चित्र पाहायला मिळत असून, शिवसेनेच्या बऱ्याच जागांवर आता थेट भाजपनेच दावा ठोकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात, अशी शक्यता आहे.
सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही जागा शिंदे गटाला मिळावी, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. त्यासाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तयारीला लागले होते. त्यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम हेही या जागेवरून आग्रही आहेत. त्यांनी तर थेट भाजपवर हल्लाबोल करत, ‘सर्वांना संपवून एकट्या भाजपलाच राहायचे आहे का,’ असा सवाल उपस्थित केला आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती.
श्रीरंग बारणे, धैर्यशील मानेंचाही पत्ता कट?
शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे मावळचे विद्यमान खासदार आहेत. मागच्या वेळी खुद्द अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवारला मैदानात उतरवून त्यांना धक्का द्यायचा प्रयत्न केला. परंतु बारणे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला. असे असतानाही श्रीरंग बारणे यांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात तिथे एक तर बारणेंना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लावणे किंवा पत्ता कट करणे असाच विचार सुरू झाल्याचे समजते. इथे एकीकडून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी बारणेंना विरोध केला आहे तर दुसरीकडे भाजपचे बाळा भेगडे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे बारणेंचा पत्ता कट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मानेंसारख्या तरुण, तडफदार नेतृत्वाला डावलले जात असल्याची चर्चा आहे. भाजप तिथे आपला उमेदवार देऊ इच्छिते. त्यात आता महायुतीचे घटक असलेल्या विनय कोरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्या नावावर फुली पडते की काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे महायुतीत शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.
...तर राजकीय संन्यास घेईन
अमरावतीत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनाही उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपने बळ दिल्याने अडसूळ यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनीही एकवेळ राजकीय संन्यास घेईन. परंतु नवनीत राणांच्या प्रचाराला जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील देखील शिंदे गटाची साथ सोडून अजित पवार गटात जायला निघाले आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.