

मुंबई : महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेनेत जागावाटपाची चर्चा सुरू असून, दोन्ही पक्षांचे नेते योग्य पद्धतीने जागावाटपाचा प्रश्न हाताळत आहेत. पुढील दोन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ९० ते १०० जागांवर आग्रही असली तरी भाजपकडून ५० ते ६० जागांवर शिंदे सेनेची बोळवण करण्यात येणार असल्याचे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर तिन्ही पक्षातील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर सोपवण्यात आल्याने भाजपने उघडपणे नाराजी जाहीर केली आहे. नवाब मलिक यांच्या जागी नवीन चेहरा दिला तर त्याचे स्वागत आहे, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे ९० ते १०० जागा लढण्यासाठी आग्रही असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेला केवळ ५० ते ६० जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपावरुन भाजप व शिवसेनेतील रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत सध्या १५० जागांवर एकमत झाले असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत असला तरी शिवसेना मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत जागावाटपाबाबत कुठलीही तडजोड करण्यास तयार नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
भाजपची ‘मिशन मुंबई’साठी निवडणूक समिती जाहीर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपने २० जणांची निवडणूक समिती जाहीर केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत केंद्र आणि राज्य स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. उमेदवारांची निवड, निवडणुकीची रणनीती आणि प्रत्यक्ष समन्वय मजबूत करणे ही समितीची जबाबदारी असणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, माजी मंत्री भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार पराग अळवणी, आमदार मिहिर कोटेचा, आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा चौधरी, आमदार चित्रा वाघ, तसेच राजेश शिरवडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर या चार मुंबई भाजपच्या महामंत्र्यांसह मुंबई महापालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचा या समितीत समावेश आहे.