विशेष प्रतिनिधी/मुंबई
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे कार्यक्रम घेऊन थेट विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावरून महायुतीत वाद रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री तथा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जागावाटपाची चर्चा सुरू असताना खा. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केलीच कशी, असा सवाल उपस्थित केला. याअगोदर भाजपनेही उमेदवारीच्या घोषणेवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे महायुतीत आता चांगलाच वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीचेही जागावाटप रखडले आहे. भाजपने राज्यातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु महायुतीत जागावाटपाचा तिढा असल्याने २८ जागांवरील उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. बऱ्याच जागांवर अजूनही भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात थेट विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे. कारण नाशिकच्या जागेवर भाजपनेही दावा केला असून, भाजपचे नेते दिनकर पाटील यांनी जोरदार तयारी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील नाशिकच्या जागेची मागणी आहे. त्यामुळे या जागेचा वाद असतानाच खा. श्रीकांत शिंदे यांनी परस्पर उमेदवारीची घोषणा केली.
या घोषणेमुळे भाजपमध्ये असंतोष वाढला असून, अनेक भाजप नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नाशिकला धाव घेतली आणि भाजप नेत्यांची समजूत काढली. तसेच खा. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेवरून नाराजी व्यक्त केली. हा वाद ताजा असतानाच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही खा. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, उमेदवारीवरून महायुतीत चर्चा सुरू असताना खा. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी घोषित केलीच कशी, त्यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर लगेचच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी, खा. शिंदे यांनी उमेदवारी घोषित केली. त्याला एवढे गांभीर्याने घेण्याची गरजच नाही. त्यांनी काहीही अधिकृत बोललेले नाही, असे म्हटले.
नैतिकतेचे धडे देऊ नका
नाशिकमध्ये लोकसभेच्या दोन टर्मपासून हेमंत गोडसे यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळावी, अशी इच्छा एक सहकारी खासदार म्हणून व्यक्त करण्यात आली. कारण खा. श्रीकांत शिंदे आणि खा. हेमंत गोडसे यांनी सभागृहात सोबत काम केले आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी आपली भूमिका मांडली असेल. उगीचच एखाद्या मुद्यावरून असे नैतिकतेचे धडे द्यायचे असतील, तर बाकी मतदारसंघात काय झाले आहे हे माहीत नाही का, त्याला तुम्ही काय म्हणणार, असा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.
युतीत शिस्त पाळायला हवी
सध्या महायुतीत उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुणीही उमेदवारी जाहीर करू नये. युतीत सगळ्यांनीच शिस्त पाळायला हवी, असे खडे बोल मंत्री छगन भुजबळ यांनी सुनावले. यावरून नाशिकची जागा किती प्रतिष्ठेची केली आहे, याचा अंदाज येतो. मात्र, जागावाटपावरून महायुतीत अजूनही टोकाचे मतभेद असल्याचे दिसून येते.