मुंबई : इच्छा असताना गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढलो नाही, पण विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला १२ जागा मिळाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना आपण पत्राद्वारे केली आहे, असे आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आरपीआय पक्ष एनडीएचा घटक असून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आरपीआय एकत्र निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट वाटपावर अजूनही चर्चा सुरू असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, कोल्हापूर, वाशिमसोबतच मुंबईतील शिवाजीनगर, मालाड आणि धारावी या जागा आरपीआयला सोडण्याची मागणी आठवलेंनी केली आहे.
पुढे रामदास आठवले म्हणाले की, आम्हाला आगामी विधानसभेत १२ जागा हव्या आहेत. तशी आम्ही मागणी केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माझी इच्छा होती लढायची, पण आम्ही लढलो नाही. जागा न घेता सर्वत्र प्रचार केला. मात्र यावेळी ते चालणार नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखी आमच्या पक्षाला दोन महामंडळ आणि विधान परिषदेची एक जागा देण्याची मागणीही आपण केली असल्याचे आठवले म्हणाले.