सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती विजयी; केसरकर चौथ्यांदा, तर नितेश राणेंची हॅटट्रिक

Maharashtra Assembly Elections Results 2024: सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तिन्ही विधानसभा मतदारसंघात जनतेने महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. शिंदे सेनेचे दीपक केसरकर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती विजयी; केसरकर चौथ्यांदा, तर नितेश राणेंची हॅटट्रिक
Published on

सिंधुदुर्ग/राजन चव्हाण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तिन्ही विधानसभा मतदारसंघात जनतेने महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. शिंदे सेनेचे दीपक केसरकर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे नितेश राणे यांनी विजयाची' हॅटट्रिक ' करत सरळ सामन्यात ' उबाठा ' चे संदेश पारकर यांचा दणदणीत पराभव केला.तर शेवटच्या क्षणी शिंदे सेनेत दाखल झालेले निलेश राणे यांनी विद्यमान आमदार 'उबाठा' सेनेचे वैभव नाईक यांच्यावर मात करत विजय खेचून आणला.

याच मतदारसंघातून २०१४ साली नाईक यांनी माजी मुख्यमंत्री व भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचा पराभव केला होता. मात्र त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी नाईक यांचा पराभव करत आपल्या वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढले. एकूणच सिंधुदुर्गातील महायुतीचा विजय हा राणे फॅक्टरचा, नारायण राणे यांच्या रणनीतीचा विजय असच म्हणावे लागेल.

जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एकाच घरात एक खासदार आणि दोन आमदार निवडून आले आहेत, तर महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहासात प्रथमच एकाच घरातले दोन सख्खे भाऊ आमदार म्हणून सभागृहात बसणार आहेत.

दीपक केसरकर हे शिंदे सेनेचे मुख्य प्रवक्ते,त्यात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी उपस्थित राहून केसरकरांना निवडून देण्याचे आवाहन केले होते.

अत्यंत चुरशीच्या आणि चौरंगी लढत असलेल्या सावंतवाडीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अपेक्षेप्रमाणे केसरकर यांनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आघाडी घेत तब्बल चौथ्यांदा आपला विजय प्रस्थापित केला. या मतदारसंघात भाजपातून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल परब हेच विजयी होणार अशी हवा होती मात्र ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र त्यांना मिळालेली मते ही दखल घेण्याजोगी आहेत असेच म्हणावे लागेल.

महायुतीचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नितेश राणे यांनी तब्बल तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅटट्रिक केली आहे. राणे यांनी सरळ सामन्यात महाविकास आघाडीचे, 'उबाठा' सेनेचे उमेदवार संदेश पारकर यांचा ५८,००७ इतक्या प्रचंड मतांनी पराभव केला.

विधासभा मतदारसंघात तर दोन सेनेत सरळ लढत होती. महाविकास आघाडीचे, ‘उबाठा' सेनेचे वैभव नाईक हे तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅटट्रिक करणार असच बोललं जात होते. मात्र पहिल्या फेरीपासूनचे निकाल जसजसे येत होते तसतशी दोघांमध्ये अटीतटीची लढत पहायला मिळत होती. कधी राणे आघाडीवर, तर कधी नाईक आघाडीवर, असे बदलते चित्र पाहायला मिळत होते मात्र या अटी तटीच्या लढतीत अखेर निलेश राणे विजयी ठरले.

सावंतवाडी मतदारसंघ (२७०)

दीपक केसरकर (शिंदे सेना)- ८०,३८९

राजन तेली (उबाठा)सेना - ४०,६६२

अर्चना घारे - परब (अपक्ष) - ६०१९

विशाल परब - (अपक्ष) -३३०५१

दीपक केसरकर - ३९,७२७ मतांनी विजयी

कुडाळ मतदारसंघ (२६९)

वैभव नाईक (उबाठा) सेना - ७२,६५३

निलेश राणे. (शिंदे गट) सेना -८०९९७

निलेश राणे ८,१७६ मतांनी विजयी

कणकवली मतदारसंघ(२६८)संदेश पारकर (उबाठा)सेना -५०,३६२

नितेश राणे (भाजपा) - १,०८३६९

नितेश राणे ५८,००७ मतांनी विजयी

logo
marathi.freepressjournal.in