Mahoor Gad : माहूरगडावर नवरात्र उत्सवात पायरीवर दिवे, कापूर लावण्यास बंदी ; सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती

पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर दर्शनाकरिता खुले राहणार
Mahoor Gad : माहूरगडावर नवरात्र उत्सवात पायरीवर दिवे, कापूर लावण्यास बंदी  ; सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती

नांदेड : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवास ता. १५ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उत्सव काळात मंदिराच्या पायऱ्यावर दिवे, कापूर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती श्री रेणुकादेवी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सोमवारी नवरात्र उत्सवाच्या आढावा बैठकीत दिली.

माहूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी पाच वाजता श्री रेणुकादेवी नवरात्र उत्सव आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रेणुकादेवी संस्थानचे सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते; तर संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शिनगारे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तालुका आरोग्य अधिकारी आर. डी. माचेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड उपस्थित होते.

सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी श्री रेणुकादेवी संस्थान, नगरपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, राज्य परिवहन महामंडळ, पोलीस विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांच्याकडून नवरात्र उत्सवाकरिता करण्यात आलेल्या तयारीचा विभागवार आढावा घेतला व आवश्यक असलेल्या सूचना दिल्या.

'अशी' असेल व्यवस्था

श्री रेणुकादेवी संस्थाने भाविकांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था, भाविकांना मुखदर्शनाकरिता मोठ्या एलसीडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नऊ दिवस महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे अशी माहिती विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली. नगरपंचायत कार्यालयाने वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेकरिता अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तर नऊ दिवस २४ तासांकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड यांनी दिली आहे.

उत्सवाकरिता शंभर बसेसची व्यवस्था

नवरात्र उत्सवाकरिता राज्य परिवहन महामंडळ शंभर बसेस उपलब्ध करून देणार आहे, सुरक्षाकरिता मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर भाविकांना दर्शनाकरिता मंदिर सकाळी पाच ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत दर्शनाकरता खुले राहणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता वेळ वाढवून देण्यात येणार आहे. भाविकांनी संस्थानच्या अधिकृत बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने देणगी जमा करावी, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयन यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in