

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र ई-केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता, आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. मात्र अनेक अपात्र महिला योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश, याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.