
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये २,२०० हून अधिक शासकीय कर्मचारी असल्याचे तपासणीत आढळून आले आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. शुक्रवारी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर पोस्ट करत तटकरे यांनी सांगितले की, लाभार्थ्यांची पडताळणी ही एक सातत्याने होणारी प्रक्रिया असणार आहे.
सुमारे २ लाख अर्जांची तपासणी केल्यानंतर २,२८९ शासकीय कर्मचारी या योजनेचे लाभार्थी असल्याचे आढळून आले. हे लक्षात येताच अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाल्या की, सरकारचे उद्दिष्ट हेच आहे की लाडकी बहिण योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, आणि त्यासाठी अर्जांची तपासणी सुरूच राहणार आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये ही योजना सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक मदत दिली जाते. मात्र, शासकीय कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत.
महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुकीतील विजय मोठ्या प्रमाणात साध्य झाल्याचे मान्य केले आहे, परंतु यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताणही निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या.