महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मुंबई पथकाने Pakistan based Intelligence Operative (PIO) ला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या एका भारतीय इसमाला अटक केली आहे. संबंधीत व्यक्ती 'पीआयओ'च्या संपर्कात असून त्यांना भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवल्याची माहिती प्राप्त झाली होती. यानंतर महाराष्ट्र दहशतवादी पथकाच्या मुंबई पथकाने ही कारवाई केली आहे.
गौरव पाटील (२३) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो नेव्हल डॉकमध्ये (सिव्हिल अप्रेंटिस) काम करत होता. दहशतवाद विरोधी पथकाकडून संशयीत इसमाची चौकशी केल्यानंतर यात संबंधीत व्यक्तीची एप्रिल/मे 2023 ते ऑक्टोबर २०२३ कालावधीत फेसबुक व वॉट्स अॅपद्वारे दोन पीआयओंशी ओळख झाल्याचं उघड झालं आहे. याच बरोबर संबंधीत संशयीत इसमाने फेसबुक व वॉट्स अॅपवर चॅट करुन त्यांना(PIO) भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती वेळोवेळी पुरवली असल्याचं, तसंच नमूद पीआयओकडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचं या चौकशीत निष्पन्न झालं आहे.
यानंतर महाराष्ट्र ATS या संशयीत इसमासह त्यांच्या संपर्कातील इतर ३ व्यक्ती, अशा एकूण ४ इसमांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथक पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करुन संशयीत इसमास अटक केली आहे. एटीएसकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.