
कराड : मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांची जी मानसिकता झाली आहे, तीच मानसिकता मराठा समाजाची झाली आहे. पण, प्रत्येकाला मेरिटच्या आधारावर शिक्षणाचा व नोकरीचा लाभ मिळावा. महाराजांनी कोणालाही अंतर दिलं नाही. जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण द्यावं, असे आवाहन भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यकर्त्यांना केले.
मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे-पाटील शनिवारी साताऱ्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उदयनराजे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसलेंनी मनोज जरांगे पाटील यांचे तलवार देऊन स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खा.उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘राज्यकर्त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की, जनगणना झाल्याशिवाय मार्ग निघू शकणार नाही. प्रत्येकाला जगायचा आणि चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. जातीपातीचं राजकारण सोडून द्या. महाराजांचे विचार आचरणात आणा. कोणाला पाडायचं आहे, ते पाडा. मी तर निवडणूक लढवणार नाही. पण, जातीवरुन फूट पाडू नका. देशाचे तुकडे करू नका. नाहीतर देशाची वाट लागेल, अशी हात जोडून विनंती उदयनराजे यांनी केली.
जरांगे-पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘तुझे कुटुंब आहे, त्याला तुझी गरज आहे. त्यामुळे तू जगला पाहिजे. छत्रपतींच्या त्या काळात शिवाजी महाराजांनी कधी कुठलाही जातभेद केला नाही आणि कोणाला अंतर दिले नाही. एक व्यक्ती एवढे करू शकतो. मात्र, आता आंदोलन करावे लागत आहे, कशामुळे हे सर्व होत आहे. कारण, त्यांच्यावर अन्याय झाला आहे. मी कोणत्याही जातीचे समर्थन करत नाही. पण, आज मनोज जरांगे पाटील मरायला तयार आहे. त्याने का मरायचे. जातीनिहाय जनगणना करा आणि कोणावर अन्याय करू नका. जे कोणी असतील त्यांना आरक्षण द्या, अशी मागणीही खा.उदयनराजे भोसले यांनी केली.