मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सुधाकर द्विवेदीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गैरहजर राहिल्याप्रकरणी आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या पाठोपाठ आणखी एक आरोपी सुधाकर द्विवेदीविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सुधाकर द्विवेदीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी
Published on

मुंबई : २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गैरहजर राहिल्याप्रकरणी आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या पाठोपाठ आणखी एक आरोपी सुधाकर द्विवेदीविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी सुनावणीला वारंवार गैरहजेरी लावल्याने सुधाकर द्विवेदीविरुद्ध १० हजार रुपयांचे वारंट बजावले. तसेच २० मार्चच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले.

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. हा खटला मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर नियमित सुरू आहे. १२ मार्चच्या सुनावणीवेळी द्विवेदी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने गंभीर दखल घेत पुढील सुनावणीला हजर राहण्याबाबत समज दिली होती.

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याविरोधातही सोमवारी वॉरंट

मालेगाव २००८ च्या बॉम्बस्फोट खटल्यात सुधाकर द्विवेदी ऊर्फ दयानंद पांडे हा दहाव्या क्रमांकाचा आरोपी आहे. खटल्यातील पहिल्या क्रमांकाच्या आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याविरोधातही न्यायालयाने चार दिवसांपूर्वी सोमवारी जामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यांनाही अजामीनपात्र वॉरंटची कारवाई टाळण्यासाठी २० मार्चच्या सुनावणीला व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in