मालवणला जाणाऱ्या बसला आग; ३४ प्रवासी बचावले

मुंबई-मालवण खासगी बसला शनिवारी रात्री कोलाड येथे भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेतून सर्व ३४ प्रवासी बचावले. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ११.४५ वाजता ही घटना घडली.
मालवणला जाणाऱ्या बसला आग; ३४ प्रवासी बचावले
Published on

नवी मुंबई : मुंबई-मालवण खासगी बसला शनिवारी रात्री कोलाड येथे भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेतून सर्व ३४ प्रवासी बचावले. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी रात्री ११.४५ वाजता ही घटना घडली.

एसी स्लीपर कोच बसमध्ये चालक, क्लीनरसह ३४ प्रवासी होते. जोगेश्वरीहून मालवणला निघालेली बस कोलाड रेल्वे स्थानकाजवळ आली. तेव्हा बसच्या पुढील बाजूने मोठा आवाज झाला. चालकाने बस थांबवली. त्याने तत्काळ सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर संपूर्ण बसने पेट घेतला.

कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते म्हणाले की, पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद केली आहे. तसेच आम्ही आरटीओला कळवले आहे. ही बस केवळ दोन वर्षे जुनी होती.

दीपक नायट्रेट कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बसला लागलेली आग विझवली.

logo
marathi.freepressjournal.in