मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण : ‘कोल्हापूर लॅब’च्या पत्र व्यवहाराची माहिती सादर करा! उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार-ठेकेदार जयदीप आपटे याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससंदर्भात कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबशी केलेल्या शेवटच्या पत्रव्यवहाराची माहिती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मालवण पोलिसांना दिले.
मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण : ‘कोल्हापूर लॅब’च्या पत्र व्यवहाराची माहिती सादर करा! उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
Published on

मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार-ठेकेदार जयदीप आपटे याच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससंदर्भात कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबशी केलेल्या शेवटच्या पत्रव्यवहाराची माहिती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मालवण पोलिसांना दिले. १४ ऑगस्टपर्यंत संबंधित माहिती सादर करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना वेळ दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीतील शिल्पकार जयदीप आपटेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केलेला लॅपटॉप आणि मोबाईल फोन परत करण्यात यावा, त्यासाठी न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती आपटेने याचिकेतून केली आहे. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी याचिकाकर्ता आपटेच्या वतीने अॅड. गणेश सोवनी यांनी, तर राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकिल संगीता शिंदे यांनी बाजू मांडली. २.४४ कोटी रुपये खर्चून राजकोट किल्ल्यावर ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला होता. त्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता. मात्र ६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा अचानक कोसळला.

कल्याण येथील घरातून फोन, लॅपटॉप जप्त

पुतळा उभारणीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुढील तपासादरम्यान आपटेला अटक केल्यानंतर त्याच्या कल्याण येथील घरातून मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला होता. ती इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचे निर्देश देण्यासाठी आपटेने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, सत्र न्यायालयाने ९ मे २०२५ रोजी त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

logo
marathi.freepressjournal.in