

सिंधुदुर्ग : मालवणी भाषा, संस्कृती आणि समृद्ध लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र ‘मालवणी संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून मालवणी भाषेचे शास्त्रीय संशोधन, दस्तऐवजीकरण, स्वतंत्र शब्दकोश निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.
मालवणी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा भाग आहे. या बोलीभाषेला समृद्ध शब्दसंपदा, म्हणी, साहित्य, लोकपरंपरा आणि स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा वारसा लाभला आहे. मात्र, या भाषेतील विविध बोली, शब्दसंपदा आणि लोकपरंपरांचे शास्त्रीय पद्धतीने संकलन व दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मालवणी भाषेतील विविध बोलींचा स्वतंत्र शब्दकोश तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या शब्दकोशाच्या माध्यमातून मालवणीतील प्रादेशिक शब्द, त्यांचे अर्थ, उच्चार आणि भाषिक वैशिष्ट्यांचे संकलन केले जाणार आहे. त्यामुळे मालवणी भाषेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आणि नव्या पिढीला महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध होणार आहेत.
स्थानिक कलाकारांच्या योगदानाला व्यापक व्यासपीठ
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला आमदार दीपक केसरकर, आमदार डॉ. निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.या संशोधन केंद्रामुळे मालवणी भाषेचे जतन, लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दस्तऐवजीकरण तसेच स्थानिक कलाकारांच्या योगदानाला व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर मालवणी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीही या केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.