केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध ममतांचा एल्गार विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन

केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध ममतांचा एल्गार
विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन

ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांविरुद्ध वापर करणाऱ्या भाजपप्रणित केंद्र सरकारविरुद्ध बिगरभाजप राज्यांतील मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्राद्वारे केले आहे. केंद्र सरकारची ही कृती देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर हल्ला असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे. “यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला जाब विचारला पाहिजे,” असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमधील संघर्ष सर्वश्रुत आहे. मागील काही वर्षांपासून त्या भाजपविरुद्ध ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. केंद्र सरकारविरुद्धच्या लढ्यात यापूर्वीही पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकी वेळीही ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. अलीकडेच केंद्र सरकारने आयएएस कायद्यात सुधारणा करण्याविषयी सूतोवाच केले होते. त्यासाठी राज्यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. “केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षांनी एकत्रितपणे विरोध करावा,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच भाजपकडून देशातील संस्थात्मक लोकशाहीवर होणाऱ्या थेट हल्ल्यांविषयीही ममता बॅनर्जींनी चिंता व्यक्त केली आहे. ईडी, सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग आणि प्राप्तिकर विभागाचा वापर विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी आणि सुडाच्या राजकारणासाठी होत असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.

ईडी आणि सीबीआयच्या संचालकांचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कायदा मंजूर करवून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ममता बॅनर्जी यांनी याला विरोध दर्शविला आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. याशिवाय, त्यांनी न्यायव्यवस्थेविषयीही खळबळजनक टिप्पणी केली आहे. “माझ्या मनात न्यायव्यवस्थेला सर्वोच्च स्थान आहे. मात्र, अलीकडच्या काळात राजकीय हस्तक्षेपामुळे लोकांना न्याय मिळत नाही. लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक आहे,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.