व्यवस्थापन अभ्यासक्रमाची परीक्षा ४ ऑगस्टला; परीक्षेसाठी ४९ हजार २१७ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटी ४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
व्यवस्थापन अभ्यासक्रमाची परीक्षा ४ ऑगस्टला; परीक्षेसाठी ४९ हजार २१७ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटी ४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ४९ हजार २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापूर्वी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे.

यंदा प्रथमच सीईटी कक्षाने बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली. मात्र यंदापासून या अभ्यासक्रमांना सीईटी बंधनकारक असल्याचे विद्यार्थ्यांना माहीत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी अतिरिक्त सीईटी परीक्षेची मागणी केली होती. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमांची अतिरिक्त सीईटी घेण्यास मंजूरी दिली होती. त्यानुसार सीईटी सेलने अतिरिक्त सीईटीसाठी २९ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली. या नोंदणीला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या परीक्षेसाठी ४९ हजार २२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये २९ हजार ७९१ मुले तर १९ हजार ४३० मुलींनी आणि ४ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या परीक्षेची तारीख सेलने निश्चित केली असून, ही परीक्षा ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी ई-मेल आणि एसएमएसद्वारे ‘ॲडमिट कार्ड’ उपलब्ध करून घेण्याबाबत सूचना देण्यात देण्यात येणार आहे.

यापूर्वी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेतली होती. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

logo
marathi.freepressjournal.in