
मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते आदींना मंत्रालयाच्या आवारात वाहन पार्किंगसाठी पास बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच विद्यमान खासदार व आमदारांना त्यांच्या वापरात असलेल्या केवळ एका वाहनास ड्रॉपिंग पास अनुज्ञेय असणार आहे. मंत्रालय प्रवेशासाठी पार्किंग, ड्रॉपिंग पास देण्यात आलेल्या वाहनांमध्ये पासधारक व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस मंत्रालयात नो एन्ट्री असणार आहे. याबाबत मंगळवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
माजी आमदार व खासदार यांना ओळख पत्रांच्या आधारे मंत्रालयात थेट प्रवेश देण्यात येईल. परंतु त्यांना आपला तपशिल माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नोंदविणे आवश्यक असेल व त्यानंतर मंत्रालय रिफिड कार्ड व फेस रिक्नेशन प्रणालीव्दारे त्यांना प्रवेश बंधनकारक करण्यात आला आहे.
डिसेंबरपर्यंत वैध असणार पास
सर्व वाहन प्रवेशपास (पार्किंग व ड्रॉपिंग) त्या कॅलेंडर वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत वैध असतील. त्यानंतर त्या प्रवेश पासचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक असेल. या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होतील.
दिव्यांग अभ्यागतांना दुपारी १२ वा. प्रवेश
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांना तासन् तास रांगेत ताटकळत उभे राहून होणारा त्रास विचारात घेता त्यांना दुपारी १२ वा. प्रवेश देण्यात यावा, तर दुपारी २.०० नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांच्यासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील.
साधारण अभ्यागतांनाही ऑनलाइन प्रवेशपास
मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्व साधारण अभ्यागतांना मंत्रालयात दुपारी २ नंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना डीजी प्रवेश ॲॅप या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. वकील व न्यायालयीन लिपिक यांना वैध दस्तावेज तपासून सकाळी १० वाजल्यानंतर प्रवेश मिळणार आहे