

माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका मातेने प्रथम स्वतः विष प्राषन करण्यापूर्वी आपल्या चार निष्पाप आणि लहान मुलांना थंडपेयातून विष पाजल्याची भीषण घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह तिच्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण रायगड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडीवर घडली आहे. आशा जाधव (२९) असे आत्मघातकी पाऊल उचलणाऱ्या आईचे नाव आहे.
स्वतःही संपवली जीवनयात्रा
आशा यांनी आपल्या चार मुलांना थंडपेयातून विष दिले आणि त्यानंतर स्वतः ही विष पिऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेत आई आशा जाधव, मुलगी नंदिनी जाधव (७) आणि दुसरी मुलगी दुर्वा जाधव (६) या तिघांचा मृत्यू झाला आहे.
वाचलेल्या दोन मुलांची प्रकृती गंभीर
आशा जाधव यांची इतर दोन मुले सुदैवाने बचावली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत या दोन्ही मुलांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
एकाच वेळी चार मुलांना विष पाजून आईने स्वतः जीवनयात्रा का संपवली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद, आर्थिक अडचण की इतर काही कारणांमुळे तिने हे गंभीर पाऊल उचलले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेची नोंद करण्यात आली असून माणगाव पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. एकाच घरातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण आदिवासी वाडीवर शोककळा पसरली आहे.