

धनंजय कवठेकर/ रायगड
खोपोली शहरात मंगेश काळोखे यांच्यासोबत घडलेल्या अघटित घटनेनंतर सामाजिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत असताना, रायगड पोलीस दलाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पोलीस पथकांची स्थापना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना असे समोर आले की, मोबाईल फोन बंद करून काही आरोपी कोकणाच्या दिशेने, काही मुंबई तर काही पुण्याकडे फरार झाले होते. याचदरम्यान या आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे आणखी काही संशयितही तपासात समोर आले आहेत.
कौशल्यपूर्ण तपास करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. अखेर अवघ्या २४ तासांच्या आत फरार असलेल्या मुख्य आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणात नाव समोर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे अद्याप फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून, लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.