
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जो प्रकार घडला तो अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काही एसओपी निर्माण झाल्या पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान, “सगळी काही रुग्णालयाची चूक आहे असे म्हणण्याचे कारण नाही. मात्र, कालचा प्रकार हा असंवेदनशीलच होता”, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी पुणे दौऱ्यावर आले होते. फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
ते म्हणाले की, फडणवीस म्हणाले, नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये बदल करून धर्मादाय आयुक्तांना नुकतेच काही अधिकार दिले. सर्व धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाइनच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवर यावी, असा आमचा प्रयत्न आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीतून उभारला आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी या हॉस्पिटलच्या वाईट आहेत, असे म्हणता येणार नाही. मात्र झालेला प्रकार हा असंवेदनशील होता. त्यामुळे जिथे चूक असेल तिथे चूक म्हणावेच लागेल. जर हॉस्पिटल प्रशासन ती चूक सुधारत असेल तर त्याचा मला आनंद आहे, असे फडणवीस म्हणाले.
समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई
मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, जोपर्यंत चौकशी समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करता येईल, याची स्पष्टता येणार नाही. त्यामुळे अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही - रुग्णालय
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जाणार नाही’, असा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत घेण्यात आला आहे.