उष्णता आणि अवकाळी पावसामुळे 'आंबा' धोक्यात! नुकसान भरपाईची मागणी

या वर्षीच्या आंबा हंगामातील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. पणन मंडळाच्या सहाय्याने गेली १६ वर्षे लासलगावच्या प्रक्रिया केंद्रातून विविध जातीच्या आंब्याची परदेशात विशेषतः युरोप,अमेरिका,आखाती देशांमध्ये आंबा निर्यात केली जात आहे.
उष्णता आणि अवकाळी पावसामुळे 'आंबा' धोक्यात! नुकसान भरपाईची मागणी

ओरोस : एकीकडे कोकणचा राजा 'हापूस' हा अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाला असतानाच ऐन हंगामात उष्णता प्रचंड वाढल्याने त्यातच १५ दिवसांपूर्वी रत्नागिरी -सिंधुदुर्गात पडलेल्या अवकाळी पावसाने आंबा पीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी, बागायतदार आणि आंबा व्यापारी धास्तावले आहेत.

या वर्षीच्या आंबा हंगामातील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. पणन मंडळाच्या सहाय्याने गेली १६ वर्षे लासलगावच्या प्रक्रिया केंद्रातून विविध जातीच्या आंब्याची परदेशात विशेषतः युरोप,अमेरिका,आखाती देशांमध्ये आंबा निर्यात केली जात आहे. यंदाच्या हंगामात पहिल्या टप्प्यात २८ टन हापूस आंबा थेट अमेरिकेत निर्यात करण्यात आला. यामध्ये सुमारे ३० टक्के हापूस आंबा हा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आहे.

भारतातील विविध प्रकारच्या आंब्यांना असलेली विशिष्ट गोडी, चव, आकार यामुळे परदेशात त्यांना वाढती मागणी आहे. साहजिकच या देशांच्या मानकांप्रमाणे सर्व आंब्यांवर प्रक्रिया करून तो पाठवला जातो. कोकणातल्या 'हापूस'ची परदेश वारी सुरू होते ना होते, तोच गेल्या काही दिवसांपासून कोकणात वाढलेल्या उन्हाच्या चटक्याने ऐन हंगामात आंबा पीक धोक्यात आले. तापमानवाढीने फळगळती तर झालीच शिवाय आंबा करपण्याचे प्रमाणही वाढले. जमिनीवर गळून पडलेल्या फळामुळे फळमाशीचा उपद्रव वाढू लागला.

त्यातच भरीस भर म्हणून की काय, १५ दिवसांपूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडल्याने आणि त्यानंतर आलेल्या उष्णतेच्या लाटेने, तर आता उरले सुरले आंब्याचे पिकही धोक्यात आले आहे. स्थानिक बाजारात मात्र आंब्याचे दर खाली आले असले, तरी त्याच्या दर्जाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in