
कराड : सातारा जिल्ह्यात ऐन थंडीच्या हंगामातील फेब्रुवारी महिन्यापासून तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअसवरती गेल्याने याचा शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. स्ट्रॉबेरी आणि आंबा या पिकावर वाढत्या तापमानाचा परिणाम होत आहे. स्ट्रॉबेरीचा आकार, लवकर परिपक्वता, फुलगळती तर आंब्याचा मोहर व फळगळती होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि वाई,जावळी तालुक्यात स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी जास्त असून त्यांच्या स्ट्रॉबेरीसह आंबा पिकांवर या अति उष्णेतेचा दुष्परिणाम होत असल्याने नुकसान होत आहे.
सातारा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला असून सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळा बसत असल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकांना काहीसा ब्रेक लागला आहे.महाबळेश्वर, जावळी, वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी हंगामाला फटका बसत आहे. सध्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्यातील हंगाम सुरू असून उन्हाच्या तीव्रतेमुळे स्ट्रॉबेरी लवकर पिकू लागली आहे. स्ट्रॉबेरी फळाना चटके पडणे, कमी आकारमानात ही पक्व होत असल्याने वजन कमी होणार असून चवीवरही परिणाम होणार आहे. यामुळे अंतिम टप्प्यात होणाऱ्या फायदा शेतकऱ्यांचा मिळणार नाही. आंबा मोहरातून फळधारणेच्या सुरू झाली आहे.मात्र तापमानवाढीमुळे मोहोर व फळगळती सुरु असून मोठ्या फळांना चट्टे पडत आहेत तर तापमान वाढीमुळे स्ट्रॉबेरी फळांच्या अगोदर उमलणारी फुले हि कोमेजून जात असून त्याचे फळांमध्ये रूपांतर होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे.
सध्या अनेक शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. आम्ही वाई तालुक्यात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. साधारणतः सहा महिन्याचा फळांचा कालावधी असल्याने या स्ट्रॉबेरी शेतीतून चांगले उत्पादन मिळते. मात्र, सध्या वातावरणात उष्णता वाढू लागली असल्यामुळे त्याचा फटका स्ट्रॉबेरीवर बसू लागला आहे. तापमान वाढीमुळे फुल गळती होऊ लागली असून स्ट्रॉबेरीचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही नेटच्या आच्छादन केले असल्याची प्रतिक्रिया वाई तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उमेश खामकर यांनी 'नवशक्ति ' शी बोलताना दिली आहे.