

राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने आज (दि.१७) सकाळी अटक वॉरंट जारी केले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळाप्रकरणातील त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. या शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटे यांनी आज (दि.१७) उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाकडून दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, पण या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
तातडीने सुनावणीस नकार
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी व पर्यायाने मंत्रिपदही धोक्यात आले आहे. मंगळवारी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर या घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आणि या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
अटक वॉरंटनंतर कोकाटे आजारी, मंत्रीपदासोबत आमदारकीही धोक्यात
एकीकडे अटक वॉरंट जारी झाले असताना माणिकराव कोकाटे हे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते. लिलावतीच्या ११ व्या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार २ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर आमदारकी रद्द होते. त्यामुळे मंत्रिपदासोबतच त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे.
२९ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अडकले
माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेले हे प्रकरण २९ वर्षांपूर्वीचे आहे. १९९५ मध्ये कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील १० टक्के आरक्षित सदनिका मिळवली होती. ही सदनिका मिळविण्यासाठी त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात आता जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आता पक्षप्रमुख अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.