
मुंबई : तीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका मिळविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या आणि सत्र न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिक्षेला स्थगिती देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली दिघोळे-राठोड यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या एकलपीठासमोर १८ मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली. या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती देताना कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नोंदवले.
नेमके प्रकरण काय?
तीस वर्षांपूर्वी १९९५ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला होता. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी कोकाटेंना दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. कनिष्ठ न्यायालयाने कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली.