शासनच ‘भिकारी’! शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे आता जणू समीकरणच बनले आहे. शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अडचणीत सापडलेले माणिकराव कोकाटे आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. ‘पीकविम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून १ रुपया घेते, पण शासन शेतकऱ्यांना एक रुपयाही देत नाही. याचा अर्थ सरकार ‘भिकारी’ आहे, शेतकरी नाही,’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे कोकाटेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रमी प्रकरणानंतर आपली बाजू मांडण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकाटेंनी वादग्रस्त विधान केल्यामुळे तेच पुरते अडचणीत सापडले आहेत. कोकाटे म्हणाले की, “एक रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि त्या पीकविम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्या काळात सापडले. मी ते तत्काळ रद्द केले. एक रुपयात योजना आणली, पण काहींनी गैरवापर केला. मी ५२ जीआर काढले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो. शेतावर, बांधावर, कृषी विद्यापीठांत जाऊन नवनवीन उपाय शोधले. आतापर्यंत एकही कृषीमंत्री संशोधन केंद्रावर गेला नाही, पण मी गेलो. प्रत्येक गावात हवामान केंद्र व्हावे, ही माझी मागणी आहे. मी राजीनामा देण्यासारखे काय केलंय? मी कोणाचा विनयभंग केला नाही, चोरी केली नाही, गुन्हेगार नाही. फक्त विरोधकांनी रमी गेमचा व्हिडीओ काढला आणि माझी बदनामी केली.”
“मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात कृषी विभागाचा तिसरा क्रमांक आहे. मग मी उगाचच काम करतोय का? कृषी समृद्धी योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांत तब्बल २५,००० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे,” असेही ते म्हणाले.
तत्काळ राजीनामा द्यावा - सुप्रिया सुळे
राज्याला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न असताना, शेतकऱ्यांप्रति अतिशय असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने कधीही पाहिले नव्हते. त्यात सभागृहात मोबाईलवर रमी खेळून या सगळ्यांवर त्यांनी कडी केली आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, विद्यमान कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेऊन हे खाते शेती आणि शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलतेने वागणाऱ्या व्यक्तीकडे द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
‘...तर राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन’
“मोबाईल उघडल्यावर पॉप-अप आला, तो स्कीप करायला वेळ लागला. मी गेम खेळत होतो, हे सिद्ध झाले तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावे. त्या दिवशी मी सरळ राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन,” असे आव्हान कोकाटे यांनी दिले.
वक्तव्य चुकीचे - फडणवीस
“कृषीमंत्री कोकाटे यांच्यासारख्या मंत्र्यांचे असे वक्तव्य चुकीचे आहे. ते काय बोलले, हे ऐकले नाही, पण तसे वक्तव्य केले असेल तर ते चुकीचे आहे. पीकविम्यासंदर्भात जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धत बदलली. काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला असला तरी बहुतांश वर्षामध्ये कंपन्यांना फायदा जास्त झाला. त्यामुळे आपण त्याची पद्धत बदलली. असे असताना अशाप्रकारचे वक्तव्य योग्य नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का? -सपकाळ
महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे. पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय?, असा प्रश्न पडला आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकापेक्षा एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर त्यांनी सरकारच ‘भिकारी’ आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही. पण मुख्यमंत्री त्याला का पाठीशी घालत आहेत? कोकाटेंची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिंमत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.