कृषीमंत्री रमले रमीमध्ये; सभागृहातच मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, गेम खेळत नव्हतो - माणिकराव कोकाटेंची सारवासारव

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातच मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आल्याने ते पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत.
कृषीमंत्री रमले रमीमध्ये; सभागृहातच मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, गेम खेळत नव्हतो - माणिकराव कोकाटेंची सारवासारव
Published on

मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातच मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आल्याने ते पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सदर व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला होता. याप्रकरणी विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर कोकाटे यांनी, आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो, अशी सारवासारव केली आहे.

कोकाटे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे म्हणून मी विधानसभेत काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आली. मी जाहिरात स्कीप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला, असे कोकाटे म्हणाले.

व्हिडीओबाबत आक्षेप नाही

माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ सत्ताधाऱ्यापैकीच कुणीतरी काढला असावा, असा आरोप होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, व्हिडीओ काढला त्याबाबत मला आक्षेप नाही. पण या व्हिडीओच्या माध्यमातून मला लक्ष्य करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी कृषी क्षेत्रासाठी काय काम केले आहे, असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला.

कोकाटे पुढे म्हणाले, “युट्यूबवर कुणीही व्हिडीओ सुरू केल्यानंतर त्यावर रमी खेळाच्या जाहिराती येतात. रोहित पवार यांच्याही मोबाइलमध्येही त्या येत असतील. सोशल मीडियावर जाहिराती येतच असतात. पण कुठल्या गोष्टीचे भांडवल करावे आणि करू नये, याचे रोहित पवारांना भान असावे.

... म्हणून रमी खेळण्याची वेळ - रोहित पवार

तत्पूर्वी रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, सत्तेतील राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.

राऊत यांची टीका

दरम्यान शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही कोकाटेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, दोन शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लातूरहून मुंबईला चालत आले. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आमच्या कृषीमंत्र्यांकडे वेळ नाही. मात्र, त्यांच्याकडे रमी खेळण्यासाठी वेळ आहे.

महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या डावावर लावलीय - आव्हाड

विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे. पण, त्याचे पावित्र्य नष्ट करण्याची अहमिका लागली आहे. एक आमदार ५ गुंड घेऊन येतो; मारामारी करतो. आता तर पिकांची हमी मागणाऱ्यांना रमी दाखविली जाते. ज्या रमी जुगाराने तरुणांनी आत्महत्या केल्या. तोच जुगार सभागृहात खेळला जात आहे. या महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या डावावर लावलीय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

कोकाटेंचा पलटवार

माझ्यावर विरोधी पक्ष वैयक्तिक टीका करतो. कधी माझ्या कपड्यांवर तर कधी एखाद्या विधानावर टीका केली जाते. पण माझ्या धोरणांवर, कामावर किंवा मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर विरोधी पक्ष कधीही बोलत नाही. माझे काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे. विधिमंडळाच्या सभागृहात कॅमेरे आहेत. तिथे अनुचित प्रकार करू नये, याची मला पूर्ण कल्पना आहे. मग मी गेम का खेळेन, असा सवालही कोकाटे यांनी केला.

कोकाटे जबाबदार मंत्री - तटकरे

माणिकराव कोकाटे राज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी व्हायरल व्हिडीओवर स्वतः खुलासा केला आहे. त्यांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्या देण्यात येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना मारहाण

महाराष्ट्राचे राजकारण आता हिंसक वळणावर आल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसून येत आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या समाप्तीनंतर ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडेदेखील उपस्थित होते. निवेदनादरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी निषेध म्हणून टेबलवर पत्तेही फेकण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने प्रचंड शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. या हल्ल्यात छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांना जोरदार मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीचे व्हिडीओदेखील समोर आले असून, विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण हे स्वत: तिथे मारहाण करत होते. दरम्यान, सुनील तटकरे यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी या घटनेचे समर्थन केले नाही.

logo
marathi.freepressjournal.in