

नागपूर/मुंबई : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून त्यावरून सत्ताधारी महायुतीमधील वाढत्या बेबनावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी या प्रकरणाच्या फॉरेन्सिक चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपमधील काही मंडळींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘संपवण्यासाठी’ मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्याशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नागपूरमध्ये फडणवीस म्हणाले की, जरांगे यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत ५०० कोटी रुपये पुरवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची फॉरेन्सिक पद्धतीद्वारे सखोल चौकशी केली जाईल. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदातानंतर फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने आपली भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच, या ऑडिओमध्ये ज्या भाजप नेत्यांची नावे आली आहेत, त्यांच्याबद्दलही शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत.
जरांगेंचे भाजपशी संधान
त्यानंतर काही तासांतच, रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, एका मराठा नेत्याला (एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्ट इशारा) राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी जरांगे यांनी भाजपच्या एका गटाशी संधान साधल्याचा आरोप केला. कदम यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना मराठा समाजाची फसवणूक करणे, समाजात फूट पाडणे आणि राज्य सरकारच्या टेंडर प्रक्रियेत सहभाग असणे, असे आरोप जरांगे यांच्यावर केले. भाजपमध्ये नेमके कोण एकनाथ शिंदे यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल करत कदम यांनी भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची नावे समोर आल्याचे सांगितले.
ही लोकशाहीची हत्या - राज ठाकरे
५०० कोटींच्या पेमेन्टच्या ऑडिओ क्लिपवरून मनसे नेते राज ठाकरे यांनी, ही लोकशाहीची हत्या असल्याचा, गंभीर आरोप भाजपवर केला. भाजप मीडियावर दबाव आणत असल्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर करती असल्याचाही आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही २९ मिनिटांची रेकॉर्डिंग महाराष्ट्रात जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ सदस्य आणि काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा समावेश आहे.
फडणवीसांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह
फडणवीस यांनी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर टिप्पणी करताना राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक रिपोर्टची बोलून केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. हा केवळ न्यायाचा देखावा आहे. त्यांनी केवळ रेकॉर्डिंगच्या सत्यतेची पडताळणी करण्यापुरते मर्यादित न राहता, क्लिपमधील संभाषणाचीही सखोल चौकशी करावी, असेही ठाकरे म्हणाले.
सत्य समोर आणू
हा संवाद अडीच वर्षांनंतर आताच का समोर आला, यामागे नेमके उद्देश काय आहेत, कोणाला टार्गेट केले जात आहे, कोणत्या हेतूने हे केले गेले, हे सगळे मोठे प्रश्न आमच्यासमोर आहेत. खुद्द जरांगे यांनीही या ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी केली आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चौकशीची मागणी केली आहे, भाजपनेही तीच मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची फॉरेन्सिक पद्धतीने नक्कीच सखोल चौकशी केली जाईल आणि सत्य काय ते समोर आणले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.