मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा समाजाच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. मात्र, मराठ्यांचे वादळ यावेळी आंदोलनासाठी नव्हे तर दिल्लीत अधिवेशनासाठी धडकणार असल्याची माहिती जरांगे-पाटील यांनी दिली.
देशभरातील मराठा बांधव दिल्लीत अधिवेशनासाठी दाखल होणार आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असून लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेटसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मनोज जरांगे पाटलांनी ही घोषणा केली.
“पूर्ण भारतातील मराठा बांधव एकत्र येणार आहेत. दिल्लीच्या मराठ्यांनी नियोजन केले आहे. तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी हरयाणा, पंजाब, गुजरात, बिहार, कर्नाटक या सगळ्या राज्यातून आमचे मराठा बांधव एकत्र करण्याचे ठरवले आहे,” असा प्लॅन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितला.