आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे आक्रमक

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकसान भरपाईच्या निधीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील, त्याशिवाय न्याय मिळणार नाही, अशा शब्दांत जरांगे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जरांगे आक्रमक
Published on

जालना : शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकसान भरपाईच्या निधीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील, त्याशिवाय न्याय मिळणार नाही, अशा शब्दांत जरांगे-पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईचा निधी अद्यापही जमा झाला नाही, या मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारला घेरले. ते म्हणाले, शेतकऱ्यावर जेव्हा मोठे संकट येते, तेव्हा त्याला आर्थिक हातभार लावणे ही सरकारची जबाबदारी असते.

लवकरच मोठे आंदोलन

यावेळी जरांगे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु लगेचच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

दिवाळी पाडवा आणि भाऊबीज झाल्यानंतर ते शेतकरी तज्ज्ञ आणि संघटनांसोबत अंतरवाली सराटी येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर लवकरच तारीख जाहीर करून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

फडणवीसांवर विश्वास

मराठा आरक्षणाच्या जीआरबद्दल बोलताना ते म्हणाले की, तो जीआर कोणीही रद्द करू शकत नाही आणि त्याला हात लावण्याची कोणात हिंमत नाही, मराठवाड्यातील मराठा समाज या जीआरमुळे एक ना एक दिवस १०० टक्के आरक्षणात जाणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसला आहे, तो त्यांनी ढळू देऊ नये. जीआर 'ओके' आहे, थोडाफार बिघडला असेल तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. फक्त प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in