"छगनभाऊ, तू आमच्यात काडी लावतो का?" मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

छगन भुजबळचं दंगली घडवण्याचं स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
"छगनभाऊ, तू आमच्यात काडी लावतो का?" मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका

जालना : सरकारनं दिलेल्या १३ तारखेपर्यंत गप्प राहा. खेड्यापाड्यामध्ये दंगली घडवण्याच्या डावाला बळी पडू नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे. मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते आज अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडलं. छगन भुजबळ दंगल घडवून निघून जाईल, असं जरांगे म्हणाले.

तो दंगल घडवून निघून जाईल...

मनोज जरांगे म्हणाले की, "आपण गावातील ओबीसी-मराठा घडी विस्कटून द्यायची नाही. तो (छगन भुजबळ) येवल्यावरून, आलाय. तो दंगल घडवून, भांडणं लावून निघून जाईल. शेवटी वाटोळं होणार ते गोरगरीब मराठे आणि ओबीसींचं. परत तो सापडणारही नाही. आपल्या शिवभावांनी त्यांना समजून घ्यायचं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. छगन भुजबळचं दंगली घडवण्याचं स्वप्न मराठ्यांनी पूर्ण होऊ द्यायचं नाही."

छगनभाऊ, तू आमच्यात काडी लावतो का?

ते पुढं म्हणाले की, "छगनभाऊ, तू आमच्यात काडी लावतो का? मी तुझ्या पुढचा आहे. तू ओबीसी-मराठा भांडणं लावतो? तू कितीही डाव टाकशील, ते यशस्वी होणार नाहीत. छगन भूजबळ, तू जितकं करशील, तेवढे मराठे एक व्हायला लागलेत."

मी एकटा पडलोय...

"ओबीसी समाजासाठी ओबीसींचे नेते एकवटले आहेत. मराठा समाजाचे नेते कुठे आहेत? मी एकटा पडलोय. मराठा समाजाच्या नेत्यांनीही पुढं यायला हवं. जर ओबीसी नेते ओबीसींसाठी पुढे येत असतील, तर मराठा नेत्यांनीही पुढं यायला हवं," असं जरांगे पाटील म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in