बीडमध्ये अजून एक मेळावा; दसरा मेळाव्यात मनोज जरांगे करणार शक्तिप्रदर्शन

या सभेत आपण भूमिका मांडणार आहोत आणि त्यावेळी मराठा समाजातील जनता आणि शेतकरी हजर राहतील, मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी राजकारण नसेल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
बीडमध्ये अजून एक मेळावा; दसरा मेळाव्यात मनोज जरांगे करणार शक्तिप्रदर्शन
Published on

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे विजयादशमीच्या दिवशी मेळाव्याचे आयोजन केले असून त्याला गरीब आणि गरजूंसह सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐक्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी येथे केले. या सभेत आपण भूमिका मांडणार आहोत आणि त्यावेळी मराठा समाजातील जनता आणि शेतकरी हजर राहतील, मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी राजकारण नसेल, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात सध्या जरांगे उपचार घेत असून त्यांनी तेथे वार्ताहरांशी संवाद साधला. बीडमध्ये दरवर्षी पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे दसरा मेळावा होतो, आता मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा दसरा मेळावा नारायणगड येथे होणार आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी १७ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते, मात्र मराठा समाजातील लोकांनी विनंती केल्याने त्यांनी २५ सप्टेंबर रोजी उपोषण मागे घेतले. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारे विधेयक राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात पारित केले होते, तर ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम राहिले होते.

नारायणगडावर दसरा मेळाव्याला आपण भक्त म्हणून जाणार असून कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहोत. नारायणगडला येणाऱ्या आपल्या समाजातील लोकांचे आपण आशीर्वाद घेणार आहोत. बीड आणि मराठवाड्यातील सर्वांनी त्याचप्रमाणे बाहेरगावी वास्तव्य करणाऱ्यांनी दसऱ्याला नारायणगडला यावे, असे आ‌वाहनही जरांगे यांनी केले आहे. आता आपले ऐक्य दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यभरातून सर्वांनी नारायणगड येथे यावे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in