शिंदेंनी पक्षातील मंत्र्यांना सहकार्य न करण्यास सांगितले; जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन मराठा आरक्षण मुद्द्यावर मला सहकार्य न करण्याचे आणि मराठा आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
शिंदेंनी पक्षातील मंत्र्यांना सहकार्य न करण्यास सांगितले; जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप
शिंदेंनी पक्षातील मंत्र्यांना सहकार्य न करण्यास सांगितले; जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप
Published on

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन मराठा आरक्षण मुद्द्यावर मला सहकार्य न करण्याचे आणि मराठा आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.

मंत्रिमंडळ आंदोलनाविरोधात काम करीत आहे का?

जरांगे म्हणाले, मंत्रिमंडळाची बैठक ही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी असते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आमच्याविरोधात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात त्यांनी मंत्र्यांना आम्हाला न भेटण्याचे, नोटिसा बजावण्याचे आणि सहकार्य न करण्याचे निर्देश दिले. मंत्रिमंडळ आमच्या आंदोलनाविरोधात चळवळ चालवत आहे का, जर असे असेल, तर आगामी काळात ते खासदार-आमदार कसे होतात, हे आम्ही पाहू, असा इशारा त्यांनी दिला.

२०२९ मध्ये बदला घेऊ...

सत्ताधाऱ्यांकडून मराठा आंदोलनाला सहकार्य करणाऱ्यांवर प्राप्तिकर आणि इतर चौकशांचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. "आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही आणि तुरुंगात जाण्यासही तयार आहोत. मराठा समाजाला आता कोणी फसवू शकत नाही. जे मराठा नेते आणि राजकीय मंडळी आज आमच्या सहकाऱ्यांवर चौकशा लावतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की २०२९ च्या निवडणुका फार दूर नाहीत. या अन्यायाचा बदला मराठा समाज २०२९ च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे खासदार आणि आमदार पाडून घेईल," असा इशारा त्यांनी दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in