मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचितचा महाआघाडीसमोर प्रस्ताव

महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना...
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, मनोज जारंगे पाटील यांचे आवाहन
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, मनोज जारंगे पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना वंचित बहुजन आघाडीने मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव दिला आहे. आघाडीचे नेते आता याबाबत काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत वंचितच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी जागावाटपाच्या संदर्भात प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुणे लोकसभा मतदारसंघात आघाडीचे सर्वसंमतीने उमेदवार म्हणून डॉ. अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार किमान १५ इतर मागासवर्ग समाजातील तर किमान तीन अल्पसंख्याक समाजातील असावेत, अशी सूचनाही वंचितने केली आहे. वंचितच्या या सूचनेमुळे महाविकास आघाडीसमोर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वंचितच्या वतीने आघाडीला २७ लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली. या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघाचा दोनदा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ही यादी प्रत्यक्षात २६ मतदारसंघांची आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी युती अथवा आघाडी होण्यापूर्वी गेल्या पाच वर्षात ज्या जागांची तयारी केली होती आणि जिथे वंचितला जिंकण्याची खात्री होती, अशा या जागा असल्याचे वंचितने प्रस्तावात म्हटले आहे. काही मतदारसंघ सोडून या जागांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे वंचितने म्हटले आहे.

वंचितने दिलेली लोकसभा मतदारसंघाची यादी : अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर,दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा आणि वर्धा.

logo
marathi.freepressjournal.in